धुळे : चहामधून गुंगीकारक औषध पाजून कुरियर कर्मचाऱ्याकडील ६४ लाख ८० हजार २५३ रुपयांचे दागिने चोरणाऱ्या चौघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील व्यापाऱ्यांचे सोन्याचे दागिने घेवून मुंबईच्या जय बजरंग कुरियरचा कर्मचारी गोविंद सिकरवार हे १४ जूनच्या पहाटे साडेपाच वाजता नाशिकहून धुळे बसमध्ये बसले. बसमध्ये त्यांना गुंगी आली. धुळ्याला पोहचल्यावर बॅगमध्ये ओले नारळ आणि पाण्याची बाटली ठेऊन कोणीतरी दागिने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी सिकरवार यांनी शहर पोलिसात तक्रार दिली.
उपलब्ध माहितीनुसार शहर पोलिसांचे पथक तपासासाठी उत्तरप्रदेश आणि राजस्थानात रवाना झाले. आग्रा जिल्ह्यातील जाजू गावातून पुष्पेंद्रसिंग तोमर (३२, रा. धोलपूर, राजस्थान) आणि राहुल सिसोदिया (२५, रा. आग्रा, उत्तरप्रदेश) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.दोघांकडून ४९ लाख ३६ हजार ७१५ रुपयांचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेली आठ लाखाची कार असा एकूण ५७ लाख ३६ हजार ७१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.