धुळे : शहरातील पांझरा नदीकाठी असलेल्या अग्रसेन लॉन्समध्ये विवाहासाठी वर आणि वधू पक्षाची सर्व तयारी झाली असताना एक संकट उभे ठाकले .वर पक्षाकडून वधूसाठी आणलेले दागिनेच सापडेनासे झाले. अखेर एक लाख ९५ हजार ५४२ रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार रात्री धुळे शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्यावर गुन्हा दाखल झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासंदर्भात विजय बिर्‍हाडे (रा. रेणुका नगर, संगमा चौक, धुळे) यांनी तक्रार दिली. धुळे शहरातील पांझरा नदीकाठी असलेल्या अग्रसेन लॉन्समध्ये त्यांची मुलगी अनामिका हिचा विवाह सोहळा ठरला होता. लग्नात देण्यासाठी वर पक्षाकडून एक लाख आठ हजार ९४० रुपयांचे मनी मंगळसूत्र असलेली सोन्याची पोत, ८६ हजार ६०२ रुपयांचे कानातील सोन्याचे अलंकार असे एक लाख ९५ हजार ५४२ रुपयांचे सोन्याचे दागिने आणले होते. १२ फेब्रुवारीच्या रात्री चोराने हे सर्व दागिने लंपास केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. वर आणि वधू पक्षाकडील मंडळींनी चोरीस गेलेले दागिने शोधण्याचा प्रयत्न केला, अनेकांकडे विचारपूस केली. तथापि ते सापडले नाहीत. यामुळे अखेर बिर्‍हाडे यांनी गुरुवारी रात्री पोलिसात तक्रार दिली.

हेही वाचा…नाशिकमध्ये पाणीपट्टी थकबाकीदार, अनधिकृत नळ जोडणीविरोधात मोहीम

दरम्यान, विवाह सोहळ्यांमध्ये वर आणि वधू पक्षाकडील मंडळी गडबडीत असल्याची संधी साधून अनेक भामटे दागिने, वस्तूंवर डल्ला मारत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे विवाह सोहळ्यात सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे.