नाशिक : नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृह आवारातून चंदनाची पाच झाडे कापून नेण्यात आली आहे. याबाबत कारागृह कर्मचारी गोपाल चौधरी यांनी तक्रार दिली. कारागृहाच्या आवारात हा प्रकार घडला. चोरटय़ांनी बावळी बाग परिसरातील चंदनाची पाच झाडे कापून नेली. कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांच्या निवासस्थान परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
अंबड जोड रस्त्यावरील तिड़के पेट्रोल पंप परिसरात वाहनाची धडक बसल्याने परप्रांतीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला. धर्मेद्र यादव (शिवाजीनगर सातपूर) असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे. यादव हे १५ जानेवारीच्या रात्री अंबड जोड रस्त्याने पायी जात असताना हा अपघात झाला होता. तिडके पेट्रोल पंपासमोर एका वाहनाची त्यांना जोरदार धडक बसली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. दवाखान्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघांची आत्महत्या
शहर परिसरात वेगवेगळय़ा भागांत राहणाऱ्या दोघांनी गळफास घेतला. त्यात एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. अंबिकानगर येथील राकेश अपार्टमेंटमध्ये राहाणाऱ्या हेरंब जोशी या अल्पवयीन मुलाने आपल्या राहत्या घरात पंख्यास ओढणी बांधून गळफास घेतला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना अमृतधाम परिसरात घडली. लक्ष्मीनगर येथील शारदा सोसायटीत राहणारे अशोक बोरसे (४३) यांनी घरातील पंख्यास वायर बांधून गळफास घेतला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.