लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : महाराष्ट्राला मोठी संत परंपरा असून त्यांच्याच आशीर्वादाने राज्यकारभार सुरू आहे. त्यामुळे राज्यात संतांच्या केसांनाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, असे सूचक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सदगुरु गंगागिरी महाराज संस्थानतर्फेसिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे आयोजित हरिनाम सप्ताहात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या संस्थानचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्याविरोधात अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखावल्यावरून निदर्शने होत असून त्यांच्याविरुध्द येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हरिनाम सप्ताहात मुख्यमंत्री शिंदे यांनी रामगिरी महाराजांच्या कार्याचे कौतुक केले.
सात दिवसांपासून चाललेल्या सप्ताहात मुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी हजेरी लावली. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदाय, हरिनाम सप्ताहाचे महत्व अधोरेखीत करुन १७७ वर्षांपासून ही परंपरा कायम ठेवल्याबद्दल रामगिरी महाराजांचे अभिनंदन केले. संत पाठिशी असले की आशीर्वाद, ऊर्जा व प्रेरणा मिळते. आपण राजकारणात, मुख्यमंत्री असलो तरी तुमचे स्थान, अध्यात्मिक अधिष्ठान मोठे आहे. डोक्यावर मंडप नसताना उन्हाची तमा न बाळता ४० लाख लोक या सप्ताहात सहभागी झाले, असे शिंदे यांनी सांगितले.
संस्थान परिसरात विकास कामांसाठी १५ कोटी रुपये दिले जातील. २०२३-२४ मधील वारीत सहा वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणाही शिंदे यांनी केली.