नाशिक – अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही. अनेक वेळा नकाराचा शेरा मिळून फाईल परत येत असे. परंतु, पाठपुराव्यामुळे आमचे काम झाले. दोन अडीच महिन्यात येणारे विघ्न दूर करण्यासाठी प्रयत्न करा. स्वार्थाबरोबर परमार्थही साधावा लागतो, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

जळगाव येथे शनिवारी हातपंप आणि वीजपंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात पाटील यांनी मंत्री म्हणून केलेल्या कामांचा थोडक्यात आढावा घेतला.

हेही वाचा – नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू

हेही वाचा – नाशिक : मूलभूत सुविधांअभावी मृत्यूनंतरही यातना

सरकारमधे राज्यमंत्र्याला फारसे काही करुन घेता येत नाही. उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना पाणी पुरवठा खाते मागितले नव्हते. मंत्र्याने आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांना खुश ठेवले तरच चांगले काम होऊ शकते. आमदार जर मंत्री होऊ शकतो तर, उपअभियंत्यास वरची जागा का मिळू नये, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मी माझ्या खात्यातील अनेकांना पदोन्नती दिली. माझ्यासारखा पदोन्नती देणारा दुसरा कोणी नसेल. मी देवदूत नाही. गरिबी जवळून पाहिली आहे. कष्टकऱ्यांचे पैसे जे खातात, त्यांचे हात लुळे झाल्याशिवाय राहणार नाहीत. जनतेला पाणी पाजण्याचे पुण्याचे काम मला मिळाले. आयुष्यात आता लोकांसाठीच काम करायचे आहे. राजकारणात जिथे गरज असेल, तिथेच मंत्री म्हणून बडेजावपणा केला. किती लोकांची कामे केली हे महत्वाचे. निवडणुकीत हेच आशीर्वाद कामास येणार आहेत, असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.