जळगाव – शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांतून दुचाकी, भ्रमणध्वनी संच लांबविणारे धरणगावमधून दोघांना, तर जळगावातून एक, अशा तीन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तिघा संशयितांकडून चोरीच्या दोन दुचाकींसह दोन भ्रमणध्वनी संच हस्तगत करण्यात आले आहेत.
शहरातील एमआयडीसी व तालुका पोलीस ठाणे, तसेच धरणगाव पोलीस ठाणे हद्दीत दुचाकींसह भ्रमणध्वनी चोरीचे विविध गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांतील संशयित धरणगाव व जळगावात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांना मिळाली. त्याअनुषंगाने सहाय्यक निरीक्षक नीलेश राजपूत, उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, संदीप साळवे, नितीन बाविस्कर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, ईश्वर पाटील, हेमंत पाटील, भारत पाटील, अशोक पाटील यांची दोन पथके नियुक्त केली. त्यातील एका पथकाने धरणगावातून संशयित राजू भीमसिंग बारेला (२३) व दीपक सुमर्या बारेला (२९, दोन्ही रा. मधुकरनगर, धरणगाव) यांना अटक केली. दोघांकडून दोन दुचाकींसह एक महागडा भ्रमणध्वनी संच हस्तगत केला, तर दुसर्या पथकाने संशयित रमेश फुलसिंग देवरे (२३, रा. श्रीकृष्ण कॉलनी, जळगाव) याला जळगावातून अटक करीत भ्रमणध्वनी संच हस्तगत केला.
हेही वाचा – नाशिकमध्ये ३१ टवाळखोरांविरुध्द कारवाई; परिमंडळ दोनची तपासणी मोहीम
पुढील कारवाईसाठी धरणगावातील दोघांना तालुका पोलीस ठाण्याकडे व जळगावातील संशयिताला एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले.