लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे गावात दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. सुमारे १७ तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाख ८० हजार रुपये त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले.

बाऱ्हे येथील रहिवासी सुनील राऊत यांच्याकडे झालेल्या घरफोडीत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला. बाऱ्हे पोलीस ठाण्यात या विषयी गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणच्या वतीने या घटनेचा तपास सुरू करण्यात आला. बाऱ्हे पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांना संशयित नाशिकमधील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत नाशिक येथील नांदुरनाका परिसरातील अरूण दाभाडे (५२, रा. कोळीवाडा) याला ताब्यात घेतले.

आणखी वाचा-नंदुरबार जिल्ह्यात बस उलटल्याने तीन प्रवासी गंभीर जखमी

संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संशयित हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नाशिकमधील भद्रकाली, पंचवटी, नाशिकरोड, पिंपळगाव, कळवण, इगतपुरी, सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.