लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : नवीन नाशिकमधील सावतानगर भागात सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारांनी कोयता घेऊन आरडाओरड करत धुडगूस घातला. तीन जणांवर हल्ला करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दुसऱ्या घटनेत अयोध्या मार्केटमध्ये महिन्याला पाच हजार रुपये हप्ता न दिल्यास दुकान जाळून टाकण्याची धमकी देत टोळक्याने एका व्यावसायिकाला दांडक्याने मारहाण केली. या घटनाक्रमामुळे नागरिक व व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण असून नवीन नाशिकमध्ये गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची भावना व्यक्त होत आहे.

नवीन नाशिकमधील सावतानगरात सराईत गुन्हेगार पवन वायाळ आणि त्याचे दोन ते तीन साथीदार रात्री दुचाकीवर कोयते दाखवत आरडाओरड करत फिरत होते. नागरिकांना शिवीगाळ करत त्यांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी रस्त्यावर गप्पा मारत उभ्या असणाऱ्या पंकज देसले यांच्यावर वायाळने कोयत्याने वार केले. नंतर प्रशांत शिंपी आणि अमोल शिंदे यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आम्हाला कोणी अडविल्यास त्याचा खून केला जाईल, असे धमकावत संशयितांनी रस्त्यावरील वाहनांना लाथा मारत भ्रमंती केली. या प्रकाराने भयभीत झालेल्या नागरिकांची धावपळ उडाली. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. बाजारातील मुख्य रस्त्यावरून लोक जीव वाचविण्यासाठी पळू लागले. या घटनाक्रमानंतर नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दहशत माजविणाऱ्या कोयताधारी गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली.

याबाबत पंकज देसले यांनी तक्रार दिली. या प्रकरणी सराईत गुन्हेगार पवन वायाळ आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेत एक जण जखमी झाल्याचे त्यांनी नमूद केले. सावतानगर भागात घडलेला प्रकार गंभीर आहे. या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची सूचना करण्यात आल्याचे आमदार सीमा हिरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी नवीन नाशिक अर्थात सिडकोत टिप्परसह काही टोळ्यांनी धुडगूस घातला होता. व्यापारी व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यावेळी पोलीस आयुक्त कुमार सरंगल यांनी कठोरपणे सिडकोतील गुन्हेगारी संपुष्टात आणली होती. अलीकडेच घडणाऱ्या घटनांमुळे गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची धास्ती स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. स्थानिकांना पुन्हा सरंगल यांच्या कार्यशैलीची आठवण येत आहे.

खंडणीसाठी व्यापाऱ्याला मारहाण

गणेश चौकातील अयोध्या मार्केटमध्ये खंडणीसाठी व्यावसायिकाला मारहाण करून धमकावण्यात आले. याबाबत निर्मला शिंदे यांनी तक्रार दिली. शिंदे यांचे या व्यापारी संकुलात दुकान आहे. त्या आणि मुलगा व्यंकोजीराजे नेहमीप्रमाणे दुकान सांभाळत असताना संदीप गायकवाड, अंबादास दांडेकर आणि नड्डी नामक संशयित दांडके घेऊन आले. या ठिकाणी धंदा करायचा असल्यास महिन्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुमचे दुकान जाळू अशी धमकी दिली. संशयितांनी दांडक्याने व्यंकोजीरो याला मारहाण केली. यावेळी आसपासच्या व्यावसायिकांनी धाव घेतली असता संशयितांनी कोणी मध्ये आले तर त्यांचीही अशीच गत केली जाईल, म्हणून धमकावले.

स्टेट बँक चौक येथील या व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांकडून संशयित हप्ते गोळा करतात. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना धमकावून दहशत पसरवतात. व्यावसायिक दर महिन्याला हप्ता देतात, पण घाबरून कोणी पोलीस ठाण्यात तक्रार करीत नसल्याचे शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी संदीप गायकवाडसह त्याच्या साथीदारांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकास ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Story img Loader