नाशिक – अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या इंडियन बँकेवर दरोडा टाकण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. पोलिसांच्या गस्ती पथकाचे वाहन भोंगा वाजवित आल्याने संशयित दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य सोडून पसार झाले. बँक शाखेच्या परिसरात सुरक्षिततेविषयी कोणतीही सतर्कता बाळगण्यात आलेली नाही.
अंबड औद्योगिक वसाहतीत महामार्गालगत इंडियन बँकेची शाखा आहे. गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास चोरट्याने मागील बाजूस असलेल्या खिडकीतून प्रवेश केला. तिजोरी असलेल्या खोलीच्या वरचा स्लॅब हत्याराच्या सहाय्याने फोडला. त्यानंतर आतमध्ये शिरून तिजोरी तोडण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचवेळी पोलिसांचे गस्ती वाहन त्या ठिकाणाहून भोंगा वाजवित गेल्याने चोरटे घाबरले. दरोडा टाकण्यासाठी आणलेले साहित्य जागीच टाकून ते पसार झाले. सकाळी बँकेचे कर्मचारी कामावर आल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
हेही वाचा – केळीवरील तीन टक्के कटती रद्दचा यावल बाजार समितीचा निर्णय
अंबड पोलिसांसह उपायुक्त चंद्रकांत खांडवी, प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त सिताराम कोल्हे, शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ, चुंचाळे पोलीस चौकीचे वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे, गुन्हे शाखा युनिटचे (दोन) वरिष्ठ निरीक्षक रणजीत नलावडे यांच्यासह गुन्हे शोध पथक तसेच चुंचाळे पोलीस चौकीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी न्यायवैद्यक आणि श्वान पथकाला बोलविले. परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणही तपासण्यात येत आहे. दरम्यान, बॅंकेत सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक ही व्यवस्था नाही. धोक्याचा इशारा देणाऱ्या भोंगाही नाही. त्यामुळे पोलिसांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा – जळगावात भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष; तरुणांसह महिलेला संधी
सर्व वित्तीय संस्थांना पत्र
शहर परिसरातील सर्व वित्तीय संस्थांना सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षारक्षक नेमण्यासह अन्य काही सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी, असे पत्र देण्यात येणार आहे. अंबड येथील इंडियन बँकेत सुरक्षाविषयक कोणतीही व्यवस्था नसल्याने चोरटे इतके धाडस करू शकले. पोलिसांची गस्त असल्याने बँकेतील चोरी टळली. तिजोरीच्या खोलीत छताला खोदलेला खड्डा हा लहान मुलाला आतमध्ये पाठवून चोरी करण्याचा प्रयत्न असल्याचा अंदाज आहे. – डॉ. सीताराम कोल्हे (सहायक आयुक्त-गुन्हे )