नाशिक: दिवाळीची धामधुम सुरू असताना शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. वेगवेगळ्या भागात चार घरफोडींमध्ये चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. यात दिवसा झालेल्या दोन घरफोडींचा समावेश आहे. अंबड, म्हसरूळ, उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे प्रकार घडले. पहिली घटना मखमलाबाद परिसरातील स्वामी विवेकानंदनगर भागात घडली. या बाबत चित्राबाई वराड यांनी तक्रार दिली. त्या जवळच राहणाऱ्या भावाच्या घरी गेल्या असताना चोरट्यांनी दिवसा त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातून सहा हजाराची रोकड व दागिने असा सुमारे ७० हजाराचा ऐवज लंपास केला.

वराड या सायंकाळी घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना सातपूर औद्योगिक वसाहतीलगतच्या औद्योगिक वसाहतीतील सोमेश्वर कॉलनीत घडली. याबाबत अरूणा पुंड यांनी तक्रार दिली. पुंड या दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. दिवसा चोरट्यांनी त्याच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ४५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना नवीन नाशिक परिसरात घडली. या बाबत पाटीलनगर येथील एकनाथ पाटील यांनी तक्रार दिली. पाटील तळ मजल्यावर राहतात. घरमालक दुसऱ्या मजल्यावर राहतात. घरमालक बाहेर गावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी रात्री जिन्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून महागड्या मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. घरमालक घरी नसल्याने चोरीला गेलेल्या वस्तुंची किंमत स्पष्ट झालेली नाही. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथी घटना जेलरोडच्या इंदिरानगर झोपडपट्टी भागात घडली. या बाबत उमर हनिफ शेख यांनी तक्रार दिली. शेख कुटूंबिय रात्री कथडा भागात मुक्कामी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील रोकड व दागिने असा सुमारे ७० हजाराचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.