नाशिक : नाशिकरोड परिसरातील सिन्नर फाटा येथे एका इमारतीच्या गाळ्यात असलेले इंडिया नंबर वन बँकेचे एटीएम यंत्र मंगळवारी पहाटे कटरच्या सहाय्याने कापून वाहनातून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. रिक्षाचालकाच्या सर्तकतेमुळे हा प्रयत्न फसला.
सिन्नर फाटा येथे माजी नगरसेवक बाजीराव भागवत यांच्या सदाशिव पॅलेस इमारतीच्या गाळ्यात इंडिया नंबर वन बँकेचे एटीएम केंद्र आहे. या इमारतीसमोरच सिन्नरफाटा पोलीस चौकी आहे. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास तीन ते चार जणांनी कटरच्या सहाय्याने एटीएम यंत्र कापले. अर्ध्या तासात यंत्र पूर्णपणे कापून बाहेर आणले. एका मालवाहू वाहनात यंत्र टाकण्यात येत असताना त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या एका रिक्षाचालकास हा प्रकार संशयास्पद वाटला.
हेही वाचा…टंकलेखन परीक्षेत गैरप्रकार, बनावट विद्यार्थ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा
रिक्षाचालकाने त्या ठिकाणी दोन फेऱ्या मारत या प्रकाराचा अंदाज घेत थेट नाशिकरोड पोलीस ठाणे गाठले. रिक्षाचालक आपल्या मार्गावर असल्याचे चोरट्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी एटीएम यंत्र तेथेच टाकत मालवाहू वाहनातून पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यांतर सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, पोलीस चौकी समोर असतानाही हा प्रकार घडलाच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याआधी सामनगाव रस्त्यावरील तंत्रनिकेतनजवळ आठ महिन्यांपूर्वी अशी घटना घडली होती.