धुळे – आगामी सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी आणि नागरिकांना भयमुक्त वातावरणात जीवन जगण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विविध उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने धुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना सक्त कारवाईचा संदेश देत धुळ्यातील तीन जणांना हद्दपार करण्यात आले आहे. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ही माहिती दिली.
लोकसभा निवडणूक जाहीर होताच राजकीय पातळीवर घडामोडींना सुरुवात झाली असताना पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यासह जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा येईल, असे कृत्य करणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून कार्यवाही करण्यात येत आहे.
हेही वाचा – राणांसमोर घटक पक्षांची एकजूट राखण्याचे आव्हान
हेही वाचा – सांगलीसाठी आघाडीतून मैत्रीपूर्ण लढतीसाठी कॉंग्रेसचा दबाव
कोणत्याही निवडणुकीत वादविवाद होत असतात. काही समाजकंटक निवडणुकीचा फायदा घेऊन आपला हेतू साध्य करण्यासाठी चिथावणी देण्याचे प्रयत्न करत असतात. त्यामुळे शहराच्या शांततेला धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, धुळे शहरातील जुने धुळे भागातील प्रतिक उर्फ मल्ल्या बडगुजर, प्रशांत उर्फ टिंकू बडगुजर आणि भूषण माळी यांना दोन वर्षासाठी धुळे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. हे तिघे जण सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुध्द दादागिरी करणे, दहशत निर्माण करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न, दंगा, विनयभंग, दरोडा घालणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.