लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीतील ज्येष्ठ वारकरी तथा नाशिकचे माजी विश्वस्त पुंडलिकराव थेटे यांना एक लाखाच्या खंडणीसाठी एका राजकीय पक्षाचे नाव घेऊन धमकी देणे हा प्रकार अत्यंत निंदनीय असून यामागे कोणत्या छुप्या शक्ती कार्यरत आहेत याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी संत निवृत्तीनाथ संस्थानचे सचिव तथा विश्वस्त अमर ठोंबरे यांनी केली आहे.

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीत सामील असलेले ज्येष्ठ वारकरी पुंडलिकराव थेटे यांना दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने राजकीय पक्षाच्या नावाने धमकी देत एक लाख रुपयांची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर संस्थानची भूमिका ठोंबरे यांनी मांडली आहे. कोणताही राजकीय पक्ष अथवा राजकारण यापासून वारकरी चार हात दूर राहतात. परंतु, काही अपप्रवृत्ती समाजात वावरत असतात. त्यांचा हेतू हा समाजातील चांगल्या व्यक्तींना बदनाम करणे हा असतो. त्यातलाच हा प्रकार आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात अहमदनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही संस्थानला पोलिसांकडून देण्यात आले आहे.

आणखी वाचा-पर्यावरणस्नेही सायकल वारीचे पंढरपूरकडे प्रस्थान

पोलिसांनी अज्ञात व्यक्ती लवकरात लवकर शोधून कठोर कारवाई केल्यास यापुढे अशी हिम्मत करण्याचे धाडस कोणी करणार नाही. वारीतील एक ज्येष्ठ कीर्तनकार व भागवत धर्माचे निष्ठावंत उपासक रामनाथ महाराज शिलापूरकर यांचे निधन झाले असताना त्यातच धमकीचा प्रकार घडल्याने संस्थांनकडून स्पष्टीकरण देताना उशीर झाला, असे ठोंबरे यांनी नमूद केले आहे.