जळगाव – भुसावळ येथील भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे, सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्या हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांना शुक्रवारी रात्री न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता तिघांना सहा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. भुसावळ येथील जुना सातारा भागातील मरिमाता मंदिरानजीक पुलाजवळ २९ मेच्या रात्री माजी नगरसेवक बारसे व सामाजिक कार्यकर्ते राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी माजी नगरसेवक राजू भागवत सूर्यवंशी, बंटी पथरोड, शिव पथरोड, विनोद चावरिया यांच्यासह ११ जणांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
हेही वाचा >>> नाशिक महानगरपालिकेच्या पथदर्शक फलकावरील पत्रे धोकादायक स्थितीत, गडकरी चौकात पत्रे कोसळले
यातील विनोद चावरिया, राजू सूर्यवंशी यांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली, तर मुख्य संशयित करण पथरोडला नाशिकमधील द्वारका परिसरातून तेथील गुंडाविरोधी पथकाने शिताफीने अटक केली. त्यानंतर करण पथरोडला भुसावळ पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. त्याच्यासह या प्रकरणातील संशयित राजू सूर्यवंशी, विनोद चावरिया यांना शुक्रवारी दुपारी सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयात हजर न करता रात्री अकराच्या सुमारास नेण्यात आले. तिघांनाही स्वतंत्र वाहनांतून भुसावळ रेल्वे न्यायालयात नेण्यात आले. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सूर यांच्यासमोर तिघा संशयितांना हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंनी युक्तिवादानंतर न्यायाधीशांनी तिघांना सात दिवसांची अर्थात सहा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, संतोष बारसे यांचा लहान भाऊ मिथुन बारसे यांनी फिर्यादीत पाण्याच्या टँकरमुळे झालेल्या वादाचा उल्लेख केला असला, तरी न्यायालयीन कामकाजावेळी या हत्याकांडातील दुसरी बाजूही समोर आली आहे. युक्तिवादात एका हॉस्पिटलमधील सफाईच्या ठेक्याचाही संदर्भही आला. दुसरीकडे प्रकरणातील अन्य संशयितांचाही तपास पोलिसांकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे. भुसावळ शहरातील संवेदनशील भागात अजूनही पोलीस बंदोबस्त तैनात आहे.