महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांच्या भरोसा कक्षात शुक्रवारी समुपदेशनासाठी आलेल्या पतीवर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. संतोष आणि पौर्णिमा या अहिरे दाम्पत्याचे अंतर्गत वादाचे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहचल्याने त्यांचे पोलिसांच्या भरोसा कक्षाच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येत होते.
हेही वाचा >>> नाशिक: दुचाकी झाडावर धडकून दोघांचा मृत्यू
शुक्रवारी समुपदेश सुरू असताना पौर्णिमा यांचा मामा नानासाहेब ठाकरे याने महिला पोलिसांच्या उपस्थितीत चाकूने संतोष यांच्यावर हल्ला केला. भरोसा कक्षात रक्ताचा सडा पडला. याप्रकरणी पौर्णिमा अहिरे, नानासाहेब ठाकरे आणि सोबत असलेल्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. जखमी संतोष अहिरे यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अहिरे दाम्पत्याची घटस्फोटासाठी तिसरी तारीख सुरू असतांना भरोसा कक्षात हा प्रकार घडला. संशयित ठाकरे आणि सोबत असलेल्या महिलांना सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांची सतर्कता
महिला सुरक्षा कक्ष असलेल्या भरोसा कक्षात अहिरे दाम्पत्याचे समुपदेशन सुरू असताना अचानक ठाकरेने संतोष अहिरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यावेळी कक्षात सर्व महिला पोलीस कर्मचारी होत्या. आवाजामुळे बाहेर असलेले सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांचे सुरक्षारक्षक प्रकाश खैरनार यांनी धाव घेत ठाकरेच्या हातातील धारदार शस्त्र काढून घेत त्याच्या मुसक्या आवळल्या.