मालेगाव : येथील कॅम्प भागातील व्याघ्रंबरी देवीच्या मंदिरातील दानपेटी व चांदीच्या चरण पादुका अशा सुमारे २० हजारांच्या मुद्देमालाची चोरी करणाऱ्या तिघा भामट्यांना कॅम्प पोलिसांनी अटक केली असून एका संशयिताचा शोध घेण्यात येत आहे.
१३ मे रोजी पहाटेच्या सुमारास मंदिरातील दानपेटी व चरण पादुकांची चोरी झाली होती. मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून संशयितांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला होता. या प्रकरणी पुजारी हरीश मोरे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात चार संशयितांनी हे कृत्य केल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार राहुल नंदावले (२०, रा. भायगाव शिवार), अजय परदेशी (२०, रा.मोतीबाग नाका) आणि दीपेश उर्फ चिल्या गवळी (रा.गवळी वाडा) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा अन्य साथीदार मयूर उर्फ चिन्या गांगुर्डे (रा.श्रीकृष्णा नगर) हा फरार आहे. संशयितांपैकी राहुल आणि अजय हे दोघे रिक्षाचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा – धुळे : मनपाकडून अवैधपणे मालमत्तेचे मोजमाप; कर वसुली थांबविण्याची ग्राहक परिषदेची मागणी
पंधरवड्यापूर्वी एकाच रात्री सटाणा नाका भागातील गणेश काॅलनी, सप्तश्रृंगी चौक आणि अष्टविनायक काॅलनीतील मंदिरांमधून पितळी घंटा, कळस, मूर्ती असा सुमारे ५५ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या चोरीचा तपास करण्यात कॅम्प पोलिसांना यश आले होते. मंदिरातील चोरीच्या ताज्या प्रकरणात दोनच दिवसांत संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.