तीन जणांना साक्रीत अटक
नाशिक : कांद्याने भाव खाण्यास सुरुवात केल्याने लूटमार, घरफोडी, सोनसाखळी हिसकावणे यात व्यग्र असणाऱ्या जिल्ह्य़ातील चोरांची नजर आता कांद्यावर गेली आहे. त्यामुळे आता कांदे चोरी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे कांदे चोरीसाठी नाशिक जिल्ह्य़ातील चोर आता शेजारच्या जिल्ह्य़ांमध्येही जाऊ लागले असून धुळ्यातील साक्री तालुक्यात शेतातील चाळीतून कांद्याची चोरी करतांना नाशिक जिल्ह्य़ातील तीन जणांना शेतकऱ्यांनीच रंगेहात पकडले. तर, एकजण पळून गेला. शेतकऱ्यांनी या कांदा चोरांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास हा प्रकार घडला.
साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्यात सामोडे येथील शेत मालक किरण घरटे यांनी तक्रोर दिली आहे. घरटे यांचे जुन्या सामोडे गावातून म्हसदीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शेत आहे. या शेताच्या खळ्यात त्यांनी चाळ तयार करून त्यात कांदा भरुन ठेवला आहे. या लोखंडी जाळीच्या चाळीचे कुलूप तोडून पहाटेच्या अंधारात चार जणांनी कांदा चोरण्याचा प्रयत्न केला. दोन ते अडीच या वेळेत मालवाहू वाहनात चार जण कांदा भरत असल्याचे शेतात झोपलेल्या घरटे यांना दिसले. त्यांनी आरडा ओरड के ल्यावर आजूबाजूच्या शेतात झोपलेले इतर शेतकरी आणि सालदार धावत आले. त्यांना पाहून चोरांनी पळण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी तिघांना पकडले. एक जण पळून गेला. या कांदा चोरांना शेतकऱ्यांनी पकडून सकाळी साडेपाचच्या सुमारास पिंपळनेर ठाण्यात आणून पोलिसांच्या हवाली केले.
पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता मनोज भागवत (३०, रा.गोंदे दुमाला, इगतपुरी, नाशिक), संदीप सोनवणे(२२), किरण सोनवणे (२४, दोघे रा.ब्राम्हणगाव, सटाणा, नाशिक) अशी त्यांनी नावे सांगितली. पळून गेलेल्या चोराचे नाव संजय गावीत (रा.गुंजाळ, ता.साक्री) असे असल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून साडेचार हजार रुपये किमतीचा ५० किलो कांदा, तीन टोपल्या असा एकू ण ४८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदा चोरीच्या या घटनेने शेतकरी सावध झाले असून आपल्या शेतातील कांदा चोरीस जाऊ नये यासाठी आता शेतकऱ्यांवर पहारा देण्याची वेळ आली आहे.