इगतपुरीत तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रमीज अब्दुल शेख (३६, रा. भिवंडी) आणि नदीम अब्दुल शेख (३४, रा. भिवंडी), शाहनवाज शेख (४१, रा. इगतपुरी) असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
हेही वाचा- नाशिक : शालेय परिसरात टवाळखोराची विद्यार्थिनीला धमकी; गुन्हा दाखल
इगतपुरी येथील रहिवासी शाहनवाज शेख यांच्याकडे त्यांचे काही नातेवाईक आले होते. सकाळी नऊच्या सुमारास नातेवाईक नगरपरिषद तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले असता त्यातील रमीज आणि नदीम दोघांनी तलावात कडेला उभे राहुन छायाचित्र काढण्यास सुरुवात केली. असे करताना यांचा तोल गेला. ते पाहून मामा शाहनवाज त्यांना वाचविण्यासाठी गेले असता तेही बुडाले. सोबत असलेल्यांनी आरडाओरड केल्यावर काही युवकांनी तलावात उड्या घेत तिघांना बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून तत्काळ तिघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वेद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
हेही वाचा- जळगाव : सिहोरहून परतताना अपघातात पातोंड्याच्या दोन महिलांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी
यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी स्थानिकांसह रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले. पोलीस अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव घालून उपचाराबाबत माहिती विचारून रुग्णालयात कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्याचा आरोप केला. करोना काळात अनेकांनी ग्रामीण रुग्णालयात प्राणवायू सिलिंडरसह अनेक आरोग्य सुविधा दिल्या होत्या. त्या गेल्या कुठे, असा प्रश्न करीत आमदारांना शहरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा जमावाने दिला. अनेकांच्या मध्यस्थीने अखेर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी संमती दर्शविली. यावेळी नायब तहसीलदार प्रविण गोंडाळे, पोलीस निरीक्षक वसंत पथवे, उपनिरीक्षक राजाराम दिवटे, सोपान राखोंडे यांसह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.