लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव: भाजप आता निवडणुकीच्या तयारीत लागला असून, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जिल्ह्यात तीन अध्यक्ष नियुक्त करण्यात आले असून, यात तरुणांसह पहिल्यांदाच महिलेला संधी देण्यात आली आहे.

भाजपतर्फे आगामी निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी व रणनीतीही आखली जात आहे. लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केल्यानंतर आता जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. भाजपने जिल्ह्यात तीन अध्यक्ष नियुक्त करीत नावेही जाहीर केली. यात रावेर लोकसभा क्षेत्राच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल जावळे, जळगाव लोकसभा क्षेत्राच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, तर जळगाव महानगराध्यक्षपदी नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांची नियुक्ती केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. यापूर्वी जिल्ह्यात ग्रामीण आणि महानगर असे दोन अध्यक्ष नियुक्त होते. आता तीन अध्यक्ष नियुक्त केले आहेत. लोकसभेच्या रावेर व जळगाव क्षेत्रासाठी दोन, तर जळगाव महानगरसाठी स्वतंत्र अध्यक्ष नियुक्त करण्यात आला आहे.

आणखी वाचा-केळीवरील तीन टक्के कटती रद्दचा यावल बाजार समितीचा निर्णय

अमोल जावळे यांना आधी विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांना जिल्हाध्यक्षपदावर बढती देण्यात आली आहे. माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे अमोल जावळे हे पुत्र आहेत. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर हे पक्षाचे आक्रमक नेते असून, त्यांनाही बढती मिळाली आहे. ते पूर्वी शिवसेनेत होते. चार वर्षांपासून जळकेकर हे भाजपमध्ये आहेत. जळगाव महानगराध्यक्षपदावर उज्ज्वला बेंडाळे यांच्या माध्यमातून महिलेस संधी देण्यात आली आहे. त्या नगरसेविका आहेत.

आगामी दीड वर्षात लोकसभा व विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र, भाजपसाठी लोकसभा निवडणूक अधिक महत्त्वाची असून, जिल्ह्यातील रावेर व जळगाव मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे राखण्यासाठी मोर्चेबांधणी व रणनीती आखली जात आहे. आगामी निवडणुकांत भाजपसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांचे मोठे आव्हान असेल. त्यासाठी जिल्ह्यात तीन अध्यक्ष नियुक्त करताना सामाजिक दृष्टिकोनही लक्षात घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three district presidents of bjp in jalgaon opportunity for women with youth mrj
Show comments