जळगाव : जिल्ह्यातील मेहू (ता. पारोळा) येथे लाच प्रकरणी एकाच घरातील तीन जणांना अटक होण्याची घटना घडली आहे. अशा प्रकारची ही जळगाव जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. पारोळा तालुक्यातील मेहू येथील महिला सरपंच जिजाबाई पाटील, त्यांचे पती गणेश पाटील, मुलगा शुभम पाटील आणि सेतू सुविधा केंद्राची खासगी व्यक्ती समाधान पाटील यांना ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
२०१७-१८ ते २०२२-२३ या कालावधीत मेहू गावाचे सरपंच असलेल्या ४७ वर्षीय तक्रारदाराने ग्रामपंचायतीच्या व्यायामशाळेच्या बांधकामासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून सात लाखांचा निधी मंजूर करून घेतला होता. २०२३ मध्ये जिजाबाई पाटील यांची सरपंचपदी निवड झाली. त्यानंतर तक्रारदाराने व्यायामशाळेच्या मंजुरीत दिलेल्या निधीसाठी सरपंचांकडे मागणी केली. यावेळी सरपंच जिजाबाई पाटील यांनी संबंधित बांधकाम कंपनीसाठी चार लाखांचा धनादेश दिला. आणि उर्वरित तीन लाख रुपयांचे धनादेश देण्याच्या मोबदल्यात लाच मागितली. तक्रारदाराला एक लाख रुपये ३१ जानेवारी रोजी आणि नंतर ७० हजार रुपये लाच देण्यास सांगितले होते.
त्यानंतर सरपंच पती गणेश पाटील यांनी ४० हजार रुपयांची लाच मागितली. यासंदर्भात संबंधित माजी सरपंचाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने मेहू गावात सापळा रचला. खासगी व्यक्ती समाधान पाटील यास ४० हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर अन्य तीन संशयितांना अटक केली. अंगझडतीत १० हजार १७० रुपये जप्त करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नेत्रा जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.