जळगाव – जिल्ह्यातील चोपडा शहरात केंद्रीय राखीव पोलीस दलातील निवृत्त जवानाने आपल्या इच्छेविरूद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीची गोळी घालून हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडल्यानंतर खळबळ उडाली. जिल्ह्यात तीन वर्षात ऑनर किलिंगची ही तिसरी घटना उघडकीस आली असून, त्याबद्दल सर्व थरातून चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांसमोर देखील अशा घटना रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर पोलीस ठाणे अंतर्गत वर्षा कोळी आणि राकेश राजपूत यांची १२ ऑगस्ट २०२२ रोजी प्रेम प्रकरण असल्याच्या रागातून नातेवाईकांकडून हत्या करण्यात आली होती. दोघांच्या प्रेम प्रकरणाची माहिती समजल्यावर मुलगा दुसऱ्या समाजाचा असल्याने, त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकण्याविषयी वर्षाच्या मागे तिच्या भावासह इतरांनी तगादा लावला होता. त्या कारणाने त्यांच्या घरात वादही झाले होते.
दरम्यान, राकेश हा थेट घरी येऊन त्यांच्या दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत बोलू लागल्याने वर्षाच्या भावासह अन्य नातेवाईकांचा राग अनावर झाला. त्यांनी वर्षा आणि राकेश यांना दोघांना समजूत घालण्यासाठी दुचाकीवर बसवून चोपडा शहरालगतच्या नाल्याजवळ नेले. त्याठिकाणी संतापाच्या भरात बंदुकीने गोळी झाडून आधी राकेशची हत्या केली होती. त्यानंतर वर्षाचा गळा दाबून जीव घेतला होता. याप्रकरणी प्रेमीयुगुलाची हत्या करणाऱ्या भावासह पाच जणांना अमळनेर न्यायालयाने गेल्याच वर्षी जन्मठेप सुनावली होती.
दुसरी घटना जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको घरकूल परिसरात चार महिन्यांपूर्वी १९ जानेवारी रोजी घडली. चार ते पाच वर्षांपूर्वी मुकेश शिरसाट (२७) आणि पूजा सोनवणे यांचा प्रेमविवाह झाला होता. त्याच रागातून पूजाचे नातेवाईक मुकेशला नेहमीच धमकावत होते. घटनेच्या दिवशीही मुकेशचे सासरच्या लोकांशी जोरदार वाद झाले होते. त्याच वादाचे पर्यावसान नंतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात आठ ते नऊ जणांचे टोळके मुकेशच्या घरावर चालून आले. त्यापैकी एकाने मुकेशवर कोयत्याने सपासप वार केल्याने त्यातच त्याचा जीव गेला.
पतीला वाचविण्यासाठी पुढे आलेली पूजादेखील माहेरच्या लोकांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झाली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी सात संशयितांना अटक केली. ऑनर किलिंगच्या घटना थांबविण्यासाठी समाजात प्रबोधन होणे गरजेचे असल्याचे मानले जात आहे. प्रामुख्याने दुसऱ्या जातीतील मुलीशी किंवा मुलाशी विवाह हा घटक ऑनर किलिंगमध्ये महत्वाचा ठरत आहे.