नाशिक – जिल्ह्यात दोन ठिकाणी पाण्यात पडून तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. वणीजवळील सारसाळे येथील गायत्री घुटे (१२) आणि राधिका वटाणे (१२, मूळ गाव काझीमाळे, सध्या रा. सारसाळे) या दोघी शिवारातील पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.

तलावात कपडे धुवत असताना एकीचा पाय घसरुन पाण्यात पडल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरीही पाण्यात पडली. परिसरातील लोकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांना पाण्याबाहेर काढून खासगी वाहनाने वणी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डाॅक्टरांनी तपासून दोन्ही मुलींना मयत घोषित केले. याबाबत वणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दुसरी घटना सिन्नर तालुक्यात घडली. जनार्दन बुरकुल (३५, रा. वारेगवा) हा पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तो वाहून गेला. काही अंतरावर तो बेशुध्दावस्थेत सापडल्यानंतर त्याला दोडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Story img Loader