चांदवडजवळ बस आणि मोटारीची धडक
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवडजवळील रेणुका माता मंदिरासमोर गुरुवारी दुपारी राज्य परिवहनच्या बसवर मोटार धडकल्याने झालेल्या अपघातात माता-पित्यासह मुलगा असे एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार झाले. अन्य एक गंभीर जखमी झाला.
ही धडक इतकी जबरदस्त होती की, मोटारीचा निम्मा भाग बसच्या मागील बाजूने आतमध्ये शिरला. रस्त्यात उभ्या असलेल्या नादुरुस्त बसचा अंदाज चालकाला न आल्याने की मोटारीचे टायर फुटल्याने ती अकस्मात बसवर जाऊन धडकली, याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. मृत आणि जखमी हे दिंडोरी तालुक्यातील वणी येथील आहेत.
सप्तशृंगी पतसंस्थेचे संचालक महेंद्रकुमार समदडीया (५२), पत्नी वंदना (४८) आणि मुलगा हिमांशु (१८) अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. मुलगा हार्दिक समदडीया (१८) हा गंभीर जखमी आहे.
समदडीया कुटुंब नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी आपल्या फिगो फोर्ट मोटारीने धुळ्याला गेले होते. या सोहळ्यावरून परतताना चांदवडजवळ भरधाव मोटार रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या नादुरुस्त बसवर जाऊन धडकली. अपघाताची माहिती समजल्यानंतर पोलिसांसह स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समदडीया यांचे वणी गावात फर्निचरचे दुकान असून किसनलाल बोरा इंग्रजी शाळेचे ते संचालक होते. समदडीया दाम्पत्याला हिमांशू आणि हार्दिक हे दोन जुळे मुलगे. त्यापैकी हिमांशुचा मृत्यू झाला. जखमी हार्दिकवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वणी गावातील व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवले. सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.