मालेगाव : येथून जवळच असलेल्या दरेगाव शिवारात शनिवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास मालमोटार आँटो रिक्षावर उलटून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून २ जण जखमी झाले आहेत. जखमींना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील दरेगाव जवळील पर्यायी वळण रस्त्याने मालेगावकडून चाळीसगाव चौफुलीकडे प्रवाशी घेऊन अँटो रिक्षा जात होती. त्याचवेळी कापडाच्या गाठी भरलेली विरोधी दिशेने येणारी मालमोटार या रिक्षावर अचानक पलटली.

यात रिक्षा मालमोटारीखाली दाबली गेली. रिक्षामधील प्रवासी त्यात अडकले. अपघात घडल्याचे समजताच स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले. नागरिकांनी मालमोटारीत अडकलेला चालक व सहाय्यकाला आधी बाहेर काढले. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त मालमोटार हटविल्यानंतर रिक्षामधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. अब्दुल कलाम अब्दुल मनान ४७, अल्कमा मुख्तार खान (२५), व सना कौसर मोहंमद युसुफ (२४) अशी या अपघातातील मृतांची नावे असून ते मालेगावचे रहिवाशी आहेत‌. अब्दुल हा रिक्षा चालक आहे. या अपघातात मालमोटार चालक व त्याचा सहाय्यक असे दोघे जखमी झाले असून त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Story img Loader