लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: उपशिक्षकासह त्यांच्या सहकारी उपशिक्षकाची झालेली बदली रद्द करण्यासाठी एक पगार अर्थात ७५ हजाराची लाच धनादेशाच्या स्वरूपात स्वीकारताना एरंडोल येथील महात्मा फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापकासह संस्थेचे अध्यक्ष आणि कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. लाचेचा धनादेश मुख्याध्यापकांच्या नावे होता. तक्रारदार हे जळगाव येथील श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एरंडोल येथील महात्मा फुले विद्यालयात उपशिक्षक या पदावर कार्यरत आहेत.
संस्थेने तक्रारदारांची आणि उपशिक्षक या पदावर कार्यरत असलेले सहकारी मित्र, अशा दोघांची बदली एक एप्रिल रोजी एरंडोल येथून धरणगाव येथील महात्मा फुले विद्यालयात केली होती. याबाबतचा मंजुरीसाठीचा प्रस्ताव दोन मे रोजी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता.
संबंधित तक्रारदारांची आणि त्यांचा सहकारी उपशिक्षक मित्र, अशा दोघांच्या बदलीस स्थगितीसाठी आणि पाठविलेला मंजुरी प्रस्ताव रद्द करावा, अशा आशयाचे संस्थेचे पत्र जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल, असा निरोप त्यांना मिळाला. यानुसार एरंडोल येथील महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद जाधव, कनिष्ठ लिपिक नरेंद्र वाघ यांनी तक्रारदार आणि त्यांच्या सहकारी उपशिक्षकांकडे स्वतःसह श्री सावता माळी फुले विद्यालयाचे अध्यक्ष विजय महाजन यांच्यासाठी दोघांचा पूर्ण महिन्याचा एक पगार अर्थात ७५ हजार रुपये धनादेशाच्या स्वरूपाने मागितला.
हेही वाचा… जात प्रमाणपत्र महाविद्यालयांतच देण्याची मोहीम राबवा; समाजकल्याण आयुक्तांचे निर्देश
दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर पथकाने बुधवारी एरंडोल येथील महात्मा फुले विद्यालयात सापळा रचत मुख्याध्यापक जाधव यांना लाचेचा धनादेश स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी एरंडोल येथील पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक विनोद जाधव (४२, रा. योगेश्वरनगर, पारोळा), कनिष्ठ लिपिक नरेंद्र वाघ (४४, रा. समर्थनगर, पाचोरा) आणि श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचलित एरंडोल येथील महात्मा फुले विद्यालयाचा अध्यक्ष विजय महाजन (५६, रा. माळीवाडा, एरंडोल) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.