लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: शिवाजीनगर भागात दुग्ध व्यावसायिकासह मालवाहू वाहन चालकाला त्रिकूटाने मारहाण करीत खिशातील ५० हजार रुपये बळजबरीने काढून घेतले.
याबाबत दिलीप तांबे यांनी तक्रार दिली. तांबे यांचा धर्माजी कॉलनी परिसरात दूध डेअरीचा व्यवसाय आहे. रात्री तांबे यांच्या मालवाहू वाहनावरील चालक अनिल बोडके हा दुकानावर वाहन घेऊन आला होता.
हेही वाचा… जळगाव: कापूसप्रश्नी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक; १२ हजार रुपये भाव देण्याची मागणी
वाहन उभे करीत असतांना संशयित सौरभ यादव, सुजित आणि त्यांचा एक साथीदार या तिघांनी चालकास शिवीगाळ करीत मारहाण केली. तांबे आपल्या चालकाच्या मदतीला धावून गेले असता संतप्त त्रिकूटाने वाहनातील दुधाच्या कॅनचे झाकण त्यांना फेकून मारले. त्यात ते जखमी झाले. यावेळी संशयितांनी चालक, मालकास धरून ठेवत त्यांच्या खिशातील सुमारे ५० हजार रुपयांची रोकड काढून घेत पलायन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.