जळगाव –  जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. टायर फुटल्याने कार चोपडा- नाशिक शिवशाही बसवर जाऊन आदळल्याने कारमधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. एक प्रवासी गंभीर आहे. चोपडा शहरापासून पाच किलोमीटरवर सूतगिरणीजवळ हा अपघात झाला.

शिवशाही बस सकाळी सहा वाजता चोपडा बस आगारातून नाशिककडे रवाना झाली होती. शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर बस आली असता अचानक कार बसवर आदळली. ही कार अमळनेरकडून चोपड्याकडे जात होती. टायर फुटल्याने कार नियंत्रणाबाहेर गेल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. या अपघातात कारमधील तीन जणांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यात नीलेश राणे आणि शैलेश राणे या सख्ख्या भावांचा समावेश आहे. त्यांचे मित्र जितेंद्र भोकरे यांचाही मृत्यू झाला. ओंकार खोंड हे गंभीर जखमी आहेत. मयत आणि जखमी सर्व धुळे जिल्ह्यातील निजामपूरचे मूळ रहिवासी असून सध्या नाशिक येथे राहत होते. नाशिकहून सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ते निघाले होते. यावल तालुक्यातील मनुदेवी येथे नवरात्रोत्सवानिमित्त ते दर्शनासाठी जात होते. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी मदतकार्य केले. जखमी प्रवाशाला चोपड्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातासंदर्भात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.