इगतपुरी तालुक्यात २४ तासात तीन अपघात झाले. त्यात बोरटेंभे येथील तीन युवकांचा मृत्यू झाला. तर, १४ जण जखमी झाले असून त्यात तीन पोलिसांचा समावेश आहे. यापैकी एक अपघात मंगळवारी रात्री तर, दोन अपघात बुधवारी झाले.
हेही वाचा- सशस्त्र दलात मराठी मुलींचा टक्का वाढणार, नाशिकमध्ये मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था
मुंबई-आग्रा महामार्गावर मंगळवारी रात्री इगतपुरी येथील पंढरपूरवाडीजवळ झालेल्या अपघातात बोरटेंभे येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर, एक जण जखमी झाला. बोरटेंभे येथील तीन युवक मोटार सायकलने आणि त्यांचे वडील बैलगाडीने घाटनदेवीहून बोरटेंभेकडे येत असताना रात्री साडे नऊच्या सुमारास मुंबईहुन नाशिककडे जाणाऱ्या भरधाव मालमोटारीची मोटार सायकल आणि बैलगाडीला धडक बसली. या अपघातात प्रभाकर आडोळे (२५) आणि खुशाल आडोळे (२२) या भावांसह रोहित आडोळे (१९) याचा जागीच मृत्यू झाला. तर, सुधाकर आडोळे हे किरकोळ जखमी झाले. हे सर्व जण बोरटेंभे येथील रहिवासी आहेत. अपघातानंतर मालवाहू वाहनाचा चालक फरार झाला. बुधवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा- तोफखाना दलास लवकरच २६४० अग्निवीरांचे बळ; पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू
दोन अपघात बुधवारी झाले. एका गुन्ह्याप्रकरणी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. मुंबई-आग्रा महामार्ग परिसरातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीतील लिअर कंपनीजवळ नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारे पोलिसांचे वाहन उलटले. या अपघातात शहर दलाचे संतोष सौंदाणे (५७), सचिन सुक्ले (४३), रवींद्र चौधरी (३७) हे तीन पोलीस जखमी झाले. अपघाताची माहिती समजातच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा- नाशिक: मालेगावात गुंगीच्या गोळ्यांचा अवैध साठा हस्तगत – दोन जण ताब्यात
दुसरा अपघात इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरण परिसरात घडला. या परिसरात मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणाच्या कालवा दुरूस्तीचे काम सुरू आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता टॅॅक्टर चालक गंगाराम चौधरी हे मजुरांना या ठिकाणी कामासाठी घेऊन जात होते. कालव्यालगतच्या रस्त्यावर टॅक्टर घसरुन तो कालव्यात उलटला. या अपघातात १० मजूर जखमी झाले. कालव्यात पाणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. जखमींना वैतरणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.