नाशिक – वणी ते पिंपळगाव बसवंत रस्त्यावरील बोराळे फाट्याजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला थडक बसल्याने दिंडोरी तालुक्यातील तिसगाव येथील काका आणि दोन पुतणे अशा तिघांचा मृत्यू झाला.
मंगळवारी सायंकाळी झालेल्या या अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला. अपघातात दुचाकीवरील निवृत्ती कराटे (५५), केदू कराटे (३५), संतोष कराटे (३३, सर्व रा. तिसगाव) यांचा मृत्यू झाला. शेतमजुरीचे काम करणारे काका, पुतणे वणी येथे आठवडे बाजारासाठी जात असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविले. रात्री उशिरा ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – जळगावात उद्या जिल्हा विकास परिषद ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती
बोराळे फाटा ते तिसगाव फाटा या दोन किलोमीटरच्या अंतरात सतत अपघात होत असतात. साखरेश्वर मंदिर ते बोराळे फाट्यादरम्यान उताराचा रस्ता असल्याने आणि बोराळे फाट्यावर काहीसा वळणाचा रस्ता असल्याने या भागात वाहनांवरील नियंत्रण सुटण्याचा धोका असतो. हा रस्ता काँक्रिटचा असल्याने या भागात वेगामुळे वाहने घसरण्याचे प्रमाण अधिक आहे. बोराळे फाटा येथे गतिरोधक बसविण्याची मागणी तिसगाव, बोराळे येथील ग्रामस्थांनी केली आहे.