जळगाव – जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. भुसावळ नदीपात्रात दोन मुलांचा, तर जळगावनजीक गिरणा नदीपात्रात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. या संदर्भात पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सध्या तापमानाने उच्चांकी पातळी गाठली आहे. त्यामुळे अनेक जण नदीपात्रात पोहण्यासाठी जात असल्याचे चित्र आहे. भुसावळ शहरातील तापी नदीपात्रात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. दानिश शेख जब्बार (१७) व अंकुश ठाकूर (१७, दोघे रा. खोली, खडका रोड, भुसावळ) अशी मृत मुलांची नावे आहेत. तापी नदीवरील जुन्या पुलाच्या भागात जलसाठा असल्याने खडका रोड भागातील काही तरुण तेथे पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील रहिवाशांनी धाव घेत वाचविण्याचा प्रयत्न केला.
यातील तीन जणांना वाचविण्यास यश आले. मात्र, दोघांचा बुडून मृत्यू झाला. मृत मुलांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर कुटुंबियांसह नागरिकांनी तापी नदीवर धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तसेच शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कंखरे व कर्मचारी दाखल झाले. दरम्यान, मच्छिमार बांधवांनी दोन्ही मुलांना नदी पात्रातून शोधून नातेवाइकांच्या ताब्यात दिले. त्यांना भुसावळमधील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले. तपासणीअंती डॉक्टरांनी शेख दानिश व अंकुश ठाकूर यांना मृत घोषित केले. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. दानिशची आई मोलमजुरी करते, तर अंकुशचीही घरची परिस्थिती हलाखीची आहे.
हेही वाचा >>>हज यात्रेकरूंसाठी आजपासून विशेष लसीकरण
दुसऱ्या घटनेत जळगाव शहरानजीक गिरणा नदीपात्रात पोहताना फीट आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू झाला. राजू भिल (३५, पिंपळकोठा, एरंडोल) असे मृत तरुणाचे नाव आहे. राजू भिल हा परिवारासह पिंपळकोठा येथे वास्तव्यास होता. त्याला फीट येण्याचा आजार होता. जळगाव शहरानजीक गिरणा नदी पात्रात तो पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना त्याला अचानक फीट आली. त्यामुळे त्याला पाण्याबाहेर येता आले नाही. त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. या बाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.