नाशिक : पंचवटीत म्हसरूळ परिसरातील कलानगरात मंगळवारी ज्या व्यावसायिकाच्या घरासमोर वाहनांची तोडफोड झाली होती, त्याच घराच्या दिशेने शुक्रवारी पहाटे तिघांनी गोळीबार करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. घटनास्थळी गोळ्यांची रिकामी पुंगळी मिळाल्याचे सांगितले जाते. कलानगरात समर्थ रो हाऊस येथे साई उमरवाल (६९) हे कुटूंबियांबरोबर वास्तव्यास आहेत. तीन दिवसांपूर्वी दोन संशयितांनी त्यांच्या घरासमोरील वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले होते. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यानंतर शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता तीन संशयित दुचाकीवर आले. त्यांनी उमरवाल यांच्या घराच्या दिशेने गोळीबार केला.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित पिस्तुलीतून गोळीबार करत असल्याचे दिसत आहे. याआधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.