जळगाव : नवस फेडून श्रीरामपूरहून चाळीसगावकडे येणाऱ्या प्रवासी गाडीला बुधवारी रात्री कन्नड घाटात अपघात झाला. त्यात जळगाव जिल्ह्यातील तिघांचा जागीच मृत्यू तर, पाच जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना चाळीसगावातील खासगी आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील रहिवासी अतुल माळी यांच्या मुलीचा नवस फेडण्यासाठी बुधवारी पहाटे चार वाजता माळी कुटुंबीय आणि त्यांच्या नात्यातील इतर काही असे २० जण श्रीरामपूर येथे खासगी प्रवासी गाडीने गेले होते.

नवस फेडण्याचा कार्यक्रम आटोपून छत्रपती संभाजीनगरमार्गे चाळीसगावकडे निघाले असता, रात्री आठच्या सुमारास कन्नड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मोठ्या वळणावर चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी रस्त्यालगतच्या संरक्षण कठड्याला धडकली. काही कळायच्या आत घडलेल्या अपघातात सारजाबाई माळी (६५), नाना दामू माळी (५८, दोन्ही रा.पातोंडा,ता.चाळीसगाव), राहुल महाजन (३५, रा.गुढे, ता.भडगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमींमध्ये निंबा महाजन (७०, रा. पोहरे), संदीप माळी (३८, रा.पहाण), अनिकेत माळी (१६, रा.पातोंडा), सुनीता माळी (३८,रा.पातोंडा) यांचा समावेश आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.