नाशिक – इगतपुरी तालुक्यात घोटी-सिन्नर राज्य महामार्गावर सोमवारी सायंकाळी रिक्षा आणि कंटेनरची समोरासमोर धडक होऊन तीन जणांचा मृत्यू तर, दोन जण जखमी झाले. मृतांमध्ये कल्याण येथील चार वर्षीय बालिकेसह तिच्या वडिलांचा समावेश आहे. तर बालिकेची आई आणि अन्य नातेवाईक जखमी आहेत.
महामार्गावरील एसएमबीटी रुग्णालयाजवळ हा अपघात झाला. कल्याण येथील रिक्षाचालक अमोल घुगे हे कुटूंबिय आणि नातेवाईकांना घेऊन रिक्षाने शिर्डीकडे निघाले होते. सायंकाळी घोटी-सिन्नर रस्त्यावर एका वाहनाला मागे टाकून पुढे जाण्याच्या प्रयत्नात त्यांची रिक्षा समोरून येणाऱ्या कंटेनरला धडकली. या अपघातात रिक्षाचालक अमोल विनायक घुगे (२५, नांदवली, कल्याण) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची मुलगी स्वरा घुगे (चार), मार्तंड आव्हाड (६०) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
हेही वाचा >>>नाशिकच्या पालकमंत्रीपदावर आजही अजित पवार गटाचा दावा, मंत्री ॲड. माणिक कोकाटे यांची भूमिका
रिक्षाचालक घुगे यांची पत्नी प्रतीक्षा घुगे (२२), कलावती आव्हाड (५८, कल्याण) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राम व्होंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना एसएमबीटीच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. कंटेनर चालक राहुल कुमार प्रजापती (२८, झारखंड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्या ठिकाणी अपघात झाला ते अपघातप्रवण क्षेत्र नाही. हा अपघात रिक्षाचे टायर फुटल्यामुळे वा पुढील वाहनापुढे जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी वाडिवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.