धुळे : शहरातील अवैध गर्भपात प्रकरणात सुमन रुग्णालयाच्या डॉ. सोनल वानखेडे, दोन खासगी परिचारिकांना पोलिसांनी अटक करुन धुळे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशाने महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. संपदा कुलकर्णी यांच्यासह पथकाने सोमवारी सकाळी साक्री रोडवरील सुमन रुग्णालयात धडक कारवाई करुन अवैध गर्भपाताचा प्रकार उघडकीस आणला. डॉ. सुमन वानखेडे यांच्या मालकीचे हे रुग्णालय असून त्या ठिकाणी गर्भपाताच्या गोळ्यांचा साठाही मिळून आला होता. या प्रकरणी डॉ.संपदा कुलकर्णी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर डॉ. सोनल वानखेडे यांच्यासह खासगी परिचारिका रोहिणी शिरसाठ (३४, रा.अनिरुध्दनगर, साक्री रोड, धुळे) आणि शोभा सरदार (४०, रा.भीमनगर, साक्री रोड, धुळे) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांना पोलिसांनी अटक करुन मंगळवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आल्यावर न्या. जयश्री पुनावाला यांनी तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मागील आठवड्यात जिल्हाधिकारी पापळकर यांच्या आदेशाने शहरातील काही सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्यात आली होती. तर काही संशयित सोनोग्राफी केंद्रांना नोटीसही बजावण्यत आली होती. त्या दरम्यान साक्री रोडवरील सुमन रुग्णालयात अवैध गर्भपाताचे प्रकार चालतात, अशी तक्रार ‘आपली मुलगी’ या संकेतस्थळावर जिल्हाधिकार्यांना प्राप्त झाली. त्यानुसार पापळकर यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला सुमन रुग्णालयावर कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ.संपदा कुलकर्णी, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्त वर्षा महाजन, धुळे शहर नायब तहसीलदार अविनाश सोनकांबळे, पोलीस अधिकारी वसंत गोंधळी, पोलीस कर्मचारी मोनाली पगारे आणि कायदेशीर सल्लागार ॲड. मीरा माळी यांचे पथक स्थापन झाले.
या पथकाने सोमवारी सकाळी सुमन रुग्णालयात जाऊन चौकशी केली. यावेळी एका खोलीतून महिलेच्या किंचाळण्याचा आवाज आला. पथकाने त्या दिशेने धाव घेत खोलीचा दरवाजा उघडून पाहिले असता एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या शेजारी एक स्त्री जातीचे अर्भक होते. पथकाने त्या महिलेला तातडीने हिरे शासकीय रुग्णालयात हलविले. शेजारच्या खोलीत एक महिला गर्भपातासाठी दाखल झाली होती. पथकाने त्या महिलेचे समूपदेशन करुन तिचा गर्भपात टाळला. यावेळी रुग्णालयात प्रमुख डॉ. सोनल वानखेडे या जागेवर नव्हत्या. तेथे जे कर्मचारी आढळून आले ते प्रशिक्षित नव्हते. तसेच रुग्णालयात गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा आढळून आला. त्यामुळे पथकाने या गोळ्या जप्त करुन तेथील सोनोग्राफी यंत्रही गोठविले. त्यानंतर धुळे शहर पोलिसांना बोलावून सर्व गोष्टींचा पंचनामा करण्यात आला होता.