नाशिक: भविष्य निर्वाह निधीशी संबंधित एका प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी खासगी आर्थिक सल्लागाराच्या (दलाल) माध्यमातून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील प्रादेशिक आयुक्त गणेश आरोटे याच्यासह या कार्यालयातील अधिकारी अजय आहुजा, सल्लागार बी. एस. मंगलकर यांना न्यायालयाने एक जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संशयितांच्या घरांसह कार्यालयात अशा सात ठिकाणी छापे टाकून झडती घेतली. त्यात मोठ्या प्रमाणात रोकड व बेहिशेबी मालमत्तेशी संबंधित नोंदींची डायरी सापडल्याचे सांगण्यात आले.
या संदर्भात येथील एका बांधकाम व्यावसायिकाने मुंबई येथील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या आस्थापनेशी संबंधित प्रकरण भविष्य निर्वाह निधी कार्यालयात प्रलंबित होते. त्याचा निपटारा करण्यासाठी सातपूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील संशयित अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे दोन लाखाची लाच मागितली होती. ही रक्कम खासगी आर्थिक सल्लागाराकडे देण्यास सांगण्यात आले होते. या संदर्भात तक्रार आल्यानंतर सीबीआयच्या मुंबई विभागाचे उपमहानिरीक्षक डॉ. सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
हेही वाचा… सेवानिवृत्त शिक्षकांवर वाद्य वाजविण्याची वेळ का? धुळे महापालिकेसमोर आंदोलन
तक्रारदाराकडून दोन लाखाची रक्कम स्वीकारत असताना संशयित मंगलकरला पथकाने रंगेहात पकडले. नंतर भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील प्रादेशिक आयुक्त गणेश आरोटे, अधिकारी अजय आहुजा यांनाही अटक करण्यात आली. संशयितांच्या निवासस्थानांसह सात ठिकाणी छापे टाकून झडती घेण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व अवाजवी लाभाचा तपशील असलेली डायरी, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे सापडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. हे सर्व साहित्य पथकाने जप्त केले. संशयितांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना एक जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बँक खात्याचे विवरण पत्र मागितल्यानंतर लाचेची मागणी
आस्थापनेशी संबंधित १० लाख ५० हजार रुपये भविष्य निर्वाह निधी (पीएफ) भरलेला नाही. ही रक्कम व दंड अशी रक्कम भरावी लागेल, असे सांगत पीएफ अधिकारी अजय आहुजाने हे प्रकरण बंद करण्यासाठी तक्रारदाराकडे दोन लाखाची रक्कम मागितली होती. तत्पुर्वी, तक्रारदाराच्या बँक खात्याचे तीन वर्षाचे विवरणही संशयिताने आधीच चौकशीसाठी मागवून घेतले होते. खासगी सल्लागार व पीएफ कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांनी संगनमताने ही लाच स्वीकारल्याचे कारवाईतून उघड झाले आहे.