लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटीत मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हातगाडीला लागलेली आग विझवित असताना सिलिंडरचा स्फोट होऊन तीन जण गंभीर जखमी झाले.
स्टेट बँक चौपाटी येथे अनेक हातगाड्यांवर किरकोळ खाद्यपदार्थ विकले जातात. त्यामुळे या ठिकाणी सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत कायम गर्दी असते. मंगळवारी मध्यरात्री चौपाटीवरील एका मालगाडीला अचानक आग लागली.
आणखी वाचा-नाशिक : इगतपुरी तालुक्यात बालविवाह रोखण्यात यश
या घटनेची माहिती समजताच अग्निशमन दल आणि अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अंबड पोलिसांना स्टेट बँक चौपाटीचे अध्यक्ष राहुल गणोरे यांनीही माहिती दिली. चौपाटी येथे अंडाभुर्जी गाडीचे मालक अनुप आणि चायनीज टाऊनचे मालक किशन थापा यांच्या मालकीच्या गाड्यांना आग लागली. अग्निशमन दलाच्या वतीने आग विझविण्याचे काम सुरु असताना सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत अग्निशमन दलाचे जवान राजेश हाडस, राहुल गणोरे, अमोल खांडरे जखमी झाले. नवीन नाशिक अग्निशमनच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली.