जळगाव : पत्त्याच्या अड्ड्यावर कारवाई न करता, तो सुरू ठेवण्याच्या मोबदल्यात दरमहा चार हजारांची लाच स्विकारताना यावल तालुक्यातील फैजपूर येथील सहायक फौजदारासह दोन कर्मचार्यांना जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी फैजपूर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार हेमंत वसंत सांगळे (वय 52, रा यावल रोड, फैजपूर), पोलीस नाईक किरण अनिल चाटे (वय 44, रा. विद्यानगर, फैजपूर) व महेश ईश्वर वंजारी (वय 38, रा. लक्ष्मीनगर, फैजपूर) अशी लाचखोर अटक केलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार हा यावल तालुक्यातील पाडळसे येथील रहिवासी असून, त्याचा फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बामणोद येथे पत्त्याचा अड्डा आहे. पत्त्याच्या अड्ड्यावर कारवाई न करण्यासाठी, तसेच तो सुरू राहण्यासाठी फैजपूर येथील पोलीस ठाण्यात सहायक फौजदार हेमंत सांगळे (५२,रा. यावल रोड, फैजपूर) यांची भेट घेतली. तक्रारदाराकडे कामासह पैशांची चर्चा करीत स्वतःसाठी आणि बामणोद बीटवरील पोलीस नाईक किरण चाटे (४४, विद्यानगर, फैजपूर) यांच्यासाठी तीन हजार आणि ठाणे अंमलदार महेश वंजारी (३८, लक्ष्मीनगर, फैजपूर) यांच्यासाठी एक हजार, अशी तक्रारदाराकडे चार हजारांची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदारांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर पथकाने फैजपूर येथील पोलीस ठाण्यात सापळा रचला. तक्रारदारांनी पंचासमक्ष सहायक फौजदार सांगळे यांना चार हजार रुपये दिले. ती रक्कम वंजारी यांना दिली. त्यानुसार पथकाने दोघांना रंगेहात पकडले. नंतर संशयित चाटे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.