यावल तालुक्यातील पूर्व वनक्षेत्रात अतिक्रमण करीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून वनसंपत्ती नष्ट करण्याच्या प्रकरणात अटक केलेले तीन संशयित बुधवारी रात्री यावल पूर्व वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या ताब्यातून फरार झाल्याचे उघडकीस आले आहे या प्रकरणात यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होसिंग, सहाय्यक वनसंरक्षक हडपे हे संबंधितांवर काय कारवाई करतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा >>>शिरपूर तालुक्यात भूगर्भातील गूढ आवाजाने ग्रामस्थ भयभीत ; चौकशीची बिरसा फायटर्सची मागणी
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतातील वनविभागाच्या पूर्व पेझरपाळा या कम्पाडमेंट (कक्ष क्रमांक ७९ व ८०)मधील वनक्षेत्रात अवैधरीत्या मौल्यवान वृक्षांची तोड करीत असल्याच्या कारणांवरून वनविभागातर्फे वनाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयित प्यारासिंग पावरा, सुरेश पावरा, बिलालसिंग यांना बुधवारी भुसावळ येथील न्यायालयात हजर करून पुन्हा यावल येथील ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी सात ते साडेसातच्या सुमारास वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. यावल येथील पोलीस कोठडीत ठेवण्याची अटकेची प्रक्रिया करीत असताना रात्री आठच्या सुमारास तिन्ही संशयित फरार झाले.
हेही वाचा >>>नशिक : मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सवामध्ये कोल्हापूर विभाग विजेता
याबाबतची माहिती घेण्यासाठी यावल पूर्व वनक्षेत्रपाल विक्रम पदमोर यांच्याशी गुरुवारी सकाळी भ्रमणध्वनीवरून चार-पाच वेळा संपर्क साधला. मात्र, तो होऊ शकला नाही. त्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, तीन संशयित फरार झाल्याच्या घटनेस त्यांनी दुजोरा दिला असून, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. फरार संशयितांच्या शोधकामी वेगवेगळी पथके सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रात रात्रीच पाठविण्यात आल्याचेही सहाय्यक वनसंरक्षक हडपे यांनी सांगितले. याबाबत यावल येथील पोलीस ठाणे अंमलदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, वनविभागातील तीन संशयित फरार झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. दरम्यान, यावल पूर्व वनक्षेत्रातील तीन संशयित फरार झाल्याने यावल वनविभागाच्या भोंगळ कारभारासह वनविभागाच्या वनक्षेत्रातील सागवानी वृक्षतोड व अवैध वाहतूक, तसेच वनजमिनीवरील अतिक्रमणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावल येथील ग्रामीण रुग्णालयातून बुधवारी सायंकाळी संशयितांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर ते फरार झाले कसे, याबाबत यावल वनविभागाच्या कर्मचार्यांवर संशय व्यक्त केला जात आहे.