जिल्ह्यातील नवापूर पोलीस ठाण्याची कोठडी फोडून पळालेल्या आणि २३ दिवस पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. कन्नडमधून तिघांना अटक केल्याने आता पाचही संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत.नवापूर तालुक्यातील नवरंग गेटजवळ पाच डिसेंबर रोजी दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच संशयितांना चारचाकी वाहनासह पोलिसांनी अटक केली होती. सकाळी पावणेसातच्या सुमारास त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. सराईत संशयितांनी पोलीस ठाण्यातील कोठडीची मागील खिडकी तोडून पलायन केले होते. पोलीस कोठडीतून पाच जणांच्या पलायनामुळे पोलीस दलाची नाचक्की झाली. या घटनेप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. पोलिसांनी शोध मोहीम सुरु करुन हैदर ऊर्फ इस्त्राईल ईस्माईल पठाण (२०, कुंजखेडा, कन्नड, औरंगाबाद) याला गुजरात राज्यातील उच्छल गावाच्या परिसरात स्थानिक पोलिसांच्या मदतीने तर आठ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकीलखाँ इस्माईलखाँ पठाण (२२, कठोरा बाजार, भोकरदन, जालना) यास मध्य प्रदेशातील खडकावाणी गावाच्या जंगलात पकडले होते. मात्र तीन संशयित फरार असल्याने पोलिसांपुढे त्यांना पकडण्याचे आव्हान होते.
पोलिसांनी वेशांतर करुन कन्नड तालुक्यातील गराडा परिसरात तीन संशयितांचा शोध सुरु केला. गावालगतच्या जंगलात संशयित लपल्याने पोलिसांना ते सापडत नव्हते. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास संशयितांच्या गावालगतच्या जंगलात पोलीस पोहचले असता कुत्रे भूंकण्याच्या आवाजामुळे शेतातील झोपडीतून तीन जण पळाले. पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यात इरफान इब्राहिम पठाण (३५), युसुफ असिफ पठाण (२२), गौसखाँ हानिफखाँ पठाण (३४,ब्राम्हणी गराडा,कन्नड, औरंगाबाद) यांचा समावेश आहे.