एक दिवसात तीन हजार दुचाकीचालकांवर कारवाई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहतूक पोलिसांच्या वतीने शुक्रवारी शहर परिसरातील १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील २६ वेगवेगळ्या ठिकाणी ‘शिरस्त्राण सक्ती मोहीम’ राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत साधारणत: तीन हजारांहून अधिक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. बहुतांश वाहनचालकांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.

नाशिक शहर पोलिसांच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून दुचाकी वाहनचालकांना ‘शिरस्त्राण सक्ती’ करण्यात येत आहे. फेरी, भित्तीपत्रके, सूचना फलक तसेच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रबोधन सुरू  असले तरी ‘दुचाकीचालक आणि शिरस्त्राण’ हे समीकरण अद्याप शहर परिसरात रुजलेले नाही. याबाबत गुरुवारपासून नवमाध्यमांवर माहिती झळकत असल्याने दुचाकी वाहनचालक सावध झाले.

काहींनी घरून निघताना वाहनाची कागदपत्रे, शिरस्त्राण सोबत घेतले तर काहींनी केवळ शिरस्त्राण जवळ बाळगत वेळ मारून नेली. ज्यांच्याकडे शिरस्त्राण नाही त्यांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केला तर काहींनी ५०० रुपयांचा दंड भरण्यापेक्षा प्रवासी वाहतुकीचा मार्ग निवडला. मात्र काहींनी शिरस्त्राण न घालता आपला नेहमीचा बाणा कायम ठेवत वाहन चालविणे पसंत केले.

अशा मंडळींना वाहतूक पोलिासांनी लक्ष्य करत दंड भरा नाहीतर गाडी जमा करा असा पर्याय समोर ठेवला. काही वाहनधारकांकडे यावेळी दंड भरण्यासाठी पैसे नव्हते त्यांची वाहने जमा करत वाहतूक शाखा कार्यालयाच्या आवारात आणण्यात आले.  दंड भरल्यानंतर वाहने वाहनचालकांच्या ताब्यात देण्यात आले. काहींनी मात्र दंड किंवा गाडी जमा न करता पोलीसांशी हुज्जत घालण्यात धन्यता मानली. अशा हेकेखोर वाहनचालकांना पोलिसांनी आपला इंगा दाखविला. तर काही बहाद्दरांनी पोलीस कारवाईत दंग असल्याचे पाहात पोलिसांसमोर वेगात गाडी दामटली. या मोहिमेत शिरस्त्राण सक्तीसह चारचाकी वाहनचालकांना सीट बेल्ट सक्ती करण्यात आली. बेशिस्त रिक्षाचालकांवरही काही ठिकाणी कारवाई झाली. दंडात्मक कारवाईपेक्षा नागरिकांनी शिरस्त्राण घालावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केले आहे.

२६ ठिकाणी मोहीम

शुक्रवारी वाहतूक पोलिसांच्या वतीने शहर परिसरातील १३ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २६ ठिकाणी मोहीम राबविण्यात आली. यासाठी वाहतूक पोलीस अधिकारी, कर्मचारी, वेगवेगळ्या पोलीस ठाण्याचे ५०० कर्मचारी एकाच वेळी मोहिमेसाठी रस्त्यावर उतरले. शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी दीड या कालावधीत वाहतुक पोलीसांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत तीन हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. कारवाईत एक हजाराहून अधिक वाहने जमा करण्यात आली. काही बेशिस्त वाहनचालकांनी  दंड भरत आपली सुटका करून घेतली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three thousand action on bicyclists in a day