धुळे : तांब्याची तार विकण्याच्या बहाण्याने बोलावून मारहाण करत तिघांकडील तीन भ्रमणध्वनीसह ३८ हजाराचा ऐवज लुटणाऱ्या टोळीच्या दोन म्होरक्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चोवीस तासात पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मखधूम खान (रा.मुंब्रा,ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सूरज चव्हाण, नीलेश चव्हाण, भोलाराम भोसले, उज्वल भोसले, पी. के.पाटील, जॉनी आणि प्रदिप चव्हाण यांच्यासह अन्य तीन जणांनी बुधवारी तांब्याची तार खरेदीच्या बहाण्याने छडवेल कोर्डे (ता.साक्री) शिवारात बोलविले होते. यावेळी मोटर सायकलवरुन दोन अनोळखी व्यक्ती आले.
या दोघांनी मखदूम आणि त्यांचा मित्र कुमार जैन उर्फ अमित धवल तसेच त्यांचा मुलगा ओवेस यास गाडीवर बसवून पेटले (ता. साक्री) गावाच्या पुढे पवनचक्की जवळ नेले. या ठिकाणी आठ साथीदारांच्या मदतीने तिघांना लुटले. यावेळी झालेल्या हाणामारीत मखदूम हे जखमी झाले होते. त्यांनी प्राथमिक उपचारानंतर निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नीलेश चव्हाण आणि उज्वल भोसले (जामदा,साक्री) यांना ताब्यात घेतले. दोघांनीही सूरज चव्हाण, भोलाराम भोसले, पी.के.पाटील,जॉनी भोसले आणि प्रदिप चव्हाण यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे कबुल केले. दोघांकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटर सायकली जप्त करण्यात आल्या.