लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: चाळीसगाव शहरातील कन्नड रस्त्यावरील तंबाखू तयार करणार्या एच. एच. पटेल कंपनीलगत गटाराचे बांधकाम सुरु असताना जुनी भिंत कोसळून उत्तर प्रदेशातील तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी चाळीसगाव येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील कन्नड रस्त्यावरील एच. एच. पटेल कंपनीलगत जुनी भिंत आहे. गटाराचे बांधकाम करीत असताना जुनी भिंत कोसळली. रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत कोसळलेल्या भिंतीखाली दबून लतीफ चौरसिया (२४), मोहम्मद अकील साकील अली (२८), लतीफ रहिम बक्स (३०, सर्व रा. उत्तर प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. तिघांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी रात्री उशिरा चाळीसगाव येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.