नाशिक – विहिरीत गाळ काढत असताना क्रेनचा वायर रोप तुटल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी बागलाण तालुक्यातील मुळाणे येथे घडली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले तीनही तरुण मुळाणे गावातील आहे.
मुळाणे येथील शेतकरी यशवंत रौंदळ यांनी आपल्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम गावातीलच क्रेन मालक विनायक नाडेकर यांना दिले होते. रविवारी दुपारी जेवण करून गणेश तुळशीराम नाडेकर (२६), नितीन रामदास अहिरे (२७) व गणेश विनायक नाडेकर (२८) हे क्रेनद्वारे उतरत असताना अचानक वायर रोप तुटल्याने ते विहिरीत कोसळले. ५० ते ५५ फूट अंतरावर असताना ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेतली. विहिरीत पडलेल्या युवकांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. सटाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव पोवार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या तरुणांचे मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. दुर्घटनेत मयत झालेले हे युवक विवाहित असल्याने तिघांचा संसार उघड्यावर पडला आहे.