लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : जिल्ह्यात आठवडाभरात दुसऱ्यांदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. रावेर तालुक्यात शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह गारपिटीने जोरदार तडाखा दिल्याने केळीच्या बागा, काढणीवर आलेली ज्वारी, बाजरी तसेच मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे ४५१ हेक्टरवरील केळीच्या बागांचे नुकसान होऊन ६४९ शेतकरी बाधीत झाल्याचा प्राथमिक अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला आहे.

जिल्ह्यात एप्रिलच्या प्रारंभी झालेल्या वादळी पावसाने अमळनेर, पारोळा आणि चोपडा तालुक्यातील सुमारे २११६ हेक्टरवरील गहू, ज्वारी, बाजरी, मका, कांदा, केळी, पपई आणि इतर फळपिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर शनिवारी रावेर तालुक्याला वादळी पावसासह गारपिटीने झोडपले. या पावसामुळे रावेर शहर व परिसरात साधारण बोरांच्या आकाराची गार जवळपास १० मिनिटे पडली. ज्यामुळे काढणीवर आलेल्या ज्वारी आणि मका पिकाचे तसेच केळी बागांची मोठी हानी झाली. याशिवाय वादळामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडल्याने बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. वीज पुरवठाही खंडित झाला होता.

चार महिन्यापूर्वीही रावेर आणि यावल तालुक्यात सुमारे ११०८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊन २९ गावातील १४०७ शेतकरी बाधित झाले होते. त्यावेळी सर्वाधिक ५८८ हेक्टरवरील हरभरा पिकाचे तसेच ३८४ हेक्टरवरील केळीच्या बागांचे नुकसान झाले होते. तूर, गहू व मका पिकांचेही काहीअंशी नुकसान झाले होते. एरवी उन्हाळ्याच्या दिवसात तापमानाचा पारा ४० अंशावर गेल्यानंतर विशेषतः रावेर तालुक्यात चक्रीवादळांमुळे केळीच्या बागांचे अतोनात नुकसान होण्याचे प्रकार नेहमीच घडतात. ज्यामुळे संबंधित सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसानही सोसावे लागते.

हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतून वादळी पावसासह गारपिटीच्या नुकसानीची भरपाई देण्याची तरतूद असते. मात्र, फळपीक विमा योजनेतून पीक नुकसानीची पुरेपूर भरपाई कधीच मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी केवळ निराशा पडते. बऱ्याचवेळा नुकसानीचे पंचनामे वेळेवर होत नाही. त्यातही कमी नुकसान दाखवून भरपाईची रक्कम कमी कशी करता येईल, असाच प्रयत्न संबंधित विमा कंपनीचा असतो. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वादळी पावसासह गारपिटीचे योग्य प्रकारे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी केली आहे.