नाशिक: नाशिक ते मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भिवंडी परिसरातील गोदामांमधून ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांना वेळमर्यादा निश्चित केली जाणार आहे. दुपारी आणि रात्री काही विशिष्ट तासांत या गोदामांमधील अवजड वाहनांना महामार्गावरून मार्गक्रमण करता येईल. महामार्गावरील खड्डे बुजविण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
ठिकठिकाणी महामार्गाला पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे नाशिक-मुंबई दरम्यानचा १५० किलोमीटरचा चार ते साडेचार तासांचा प्रवास सध्या सात ते आठ तासांवर गेला आहे. या त्रासामुळे अनेक मंत्री महामार्गाने येणे टाळून रेल्वेने नाशिकला ये-जा करतात. पावसाने महामार्गाची दुरावस्था झाली आहे. महामार्गाचा भिवंडी वळण रस्त्यापर्यंतचा भाग राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या तीन यंत्रणांकडे विभागून असल्याने त्रांगडे निर्माण झाल्याकडे लक्ष वेधले जात आहे. ठाणे जिल्ह्यात महामार्गालगतच्या गोदामांमुळे अहोरात्र अवजड वाहनांची महामार्गाने ये-जा सुरू असते. त्यामुळे कोंडीत भर पडून वाहनधारक दोन-तीन तास अडकून पडतात. हे लक्षात घेऊन भिवंडी परिसरातील गोदांमातील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्याची तयारी केली जात आहे. याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांनी माहिती दिली.
हेही वाचा : प्रसिध्द भ्रमणध्वनी कंपनीच्या नावे बनावट साहित्याची विक्री – पोलिसांचा छापा
भिवंडी परिसरातील गोदामांतून देश पातळीवर कंटेनर, अवजड वाहनांद्वारे मालाची वाहतूक केली जाते. या वाहनांसाठी वेळेची मर्यादा ठेवण्यात येणार आहे. दुपारी आणि रात्री काही तास निश्चित करून त्या वेळेतच अवजड वाहनांनी महामार्गावर प्रवेश करावा, असे नियोजन केले जात असल्याचे भुसे यांनी सांगितले. यापूर्वी अवजड वाहनांसाठी दुपारी १२ ते चार आणि रात्री १२ नंतर वाहतुकीला मुभा दिली गेली होती. त्या धर्तीवर हे नियोजन केले जात आहे.
हेही वाचा : नाशिक : चिंचवेजवळ बसची मोटारीला धडक; सर्व प्रवासी सुखरूप
नाशिक-मुंबई महामार्गावर काही ठिकाणी पुलांची कामे सुरू असून तेथील सेवा रस्त्यांवर अधिक खड्डे आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन खोळंबा होतो, ही वस्तूस्थिती आहे. वाहतूक सुरळीत राखण्यासाठी खड्डे त्वरित बुजविण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. भिवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात गोदामे आहेत. तेथील अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी वेळेचे नियोजन केले जात आहे.
दादा भुसे (मंत्री, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम)