मजूर असतील तर बांधकाम प्रकल्पास चालना

नाशिक : जिल्हा प्रशासनाच्या नव्या निर्देशानुसार जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या अधिकृत दुकानदारांसाठी असलेले वेळेचे बंधन हटविण्यात आले आहे. यामुळे सध्याची १० ते दुपारी चार ही वेळमर्यादा संपुष्टात आली आहे. त्यामुळे खरेदीसाठी होणारी सामान्यांची धावपळ काही अंशी कमी होईल. रस्त्यावरील वर्दळ टाळण्यासाठी नागरिकांनी घरपोच सेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिथे मजुरांची उपलब्धता आहे, ते बांधकाम सुरू करण्यास मुभा आहे. महापालिका, नगरपालिकांना मान्सूनपूर्व कामे हाती घेता येणार असून टाळेबंदी शिथिल झाल्याचा लाभ सिन्नर, माळेगाव, दिंडोरी, इगतपुरी, गोंदे अशा काही औद्योगिक क्षेत्रास होणार आहे. येथील उद्योग सुरू होण्याची आशा पल्लवीत झाली असून १०२४ उद्योगांनी परवानगी मागितली आहे.

करोनामुळे संपूर्ण देशात टाळेबंदी लागू झाल्यापासून उद्योग व्यवसायांवर आलेले निर्बंध करोनाबाधित नसलेल्या क्षेत्रातून शिथिल करण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. जिल्ह्य़ाचा विचार करता करोनाचे नाशिक महापालिका क्षेत्रात नऊ, ग्रामीण भागात चार, मालेगाव महापालिका क्षेत्रात ७७ असे एकूण ९१ रुग्ण आढळले आहेत. यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला. सद्य:स्थितीत मालेगाव महापालिका क्षेत्र लाल तर नाशिक महापालिका क्षेत्र केशरी क्षेत्रात समाविष्ट आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत एकूण ३१ प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर झाली आहेत. यामध्ये नाशिक शहरात पाच, मालेगावमध्ये २४, चांदवड शहर आणि सिन्नर तालुक्यात एक यांचा समावेश आहे.

या परिसरातील कोणत्याही उद्योग, व्यवसायाला परवानगी नाही. लाल क्षेत्रातील मालेगावातील यंत्रमाग कारखाने बंदच राहतील. सातपूर-अंबड वसाहतीतील उद्योगांना निर्बंध शिथिल झाल्याचा लाभ मिळणार नाही. या वसाहतीलगतच्या मुख्य रस्त्यावर पाच करोनाबाधित रुग्ण आढळले. शासकीय आदेशात महापालिका, नगरपालिका क्षेत्र वगळून उद्योग सुरू करण्याचे सूचित केले आहे. यामुळे सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीतील औषध निर्मिती, अन्न प्रक्रिया, माहिती तंत्रज्ञान वगळता अन्य उद्योगांना याचा लाभ होणार नाही. ज्या उद्योगांना लाभ मिळणार आहे, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया किचकट आहे. कामगारांची वाहतूक व्यवस्था, कमी मनुष्यबळात काम, आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यास आठ दिवस लागतील. लघुउद्योजकांना याचा कोणताही लाभ होणार नसल्याचे नाशिक फर्स्टचे अभय कुलकर्णी यांनी सांगितले.

वैद्यकीय सेवेसाठी खासगी चारचाकी वाहनात चालकाव्यतिरिक्त एका प्रवाशास बसण्यास परवानगी आहे. दुचाकीवर केवळ चालक असेल. महापालिका क्षेत्रातील बांधकाम प्रकल्प सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला गेला. जिथे मजूर उपलब्ध आहे, त्यांना बाहेरून मजूर आणण्याची गरज नाही, अशी कामे सुरू करता येतील. महापालिकेला तातडीची मान्सूनपूर्व कामे हाती घेता येतील. शासकीय, स्वायत्त आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात ३३ टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली.

किराणा, फळे-भाजीपाला खरेदी सुकर

किराणा दुकाने, रेशन धान्य दुकाने, फळे, भाजीपाला, मांस आदी विक्रीसाठी वेळेचे कोणतेही बंधन राहणार नाही. याआधी सकाळी १० ते दुपारी चार ही वेळ निश्चित केलेली होती. दूध विक्रीसाठी सकाळी आणि सायंकाळी दोन स्वतंत्र वेळा दिल्या गेल्या होत्या. या आस्थापना सुरू आणि बंद करण्याच्या वेळेवर कोणतेही बंधन राहणार नाही. संबंधितांनी सामाजिक अंतर राखून कामकाज करणे अपेक्षित आहे. संचारबंदीच्या काळात नागरिकांची रस्त्यावरील वर्दळ कमी करण्यासाठी अधिकतम संस्थांनी घरपोच सेवा द्यावी, असे सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी घरपोच भाजीपाला, किराणा खरेदीवर भर द्यावा, असे प्रशासनाने म्हटले आहे.

Story img Loader