नाशिक : शहरात वाढणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीचा प्रयत्न म्हणून महानगर पालिकेच्या वतीने हरित कुंभ उपक्रमाची आखणी केली आहे. या उपक्रमातंर्गत आठ ते १८ मार्च या कालावधीत विविध स्पर्धांंचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत अडीच हजार विजेत्यांना ६० लाख रुपयांची बक्षीसे दिली जाणार आहेत. प्रत्येक स्पर्धेतील विजेत्याला १० हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वच्छता भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ च्या पार्श्वभूमीवर, नाशिकला देशात आघाडीवर नेण्यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. महिलांच्या वॉकेथॉन उपक्रमातून त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. महिला दिनापासून शहरवासीयांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उत्कृष्ट कचरा वर्गीकरण करणे, शाळांसाठी प्लास्टिक कचरा संकलन व जनजागृती, वेस्ट टू बेस्ट, होम कंपोस्टिंग व कचरा प्रक्रिया, चित्रकला व निबंधक, स्वच्छता रिल्स निर्मिती, उत्कृष्ट घंटागाडी कर्मचारी आणि उत्कृष्ट महिला सफाई कर्मचारी आणि कचरावेचक महिला या स्पर्धांचा समावेश आहे.

वॉकेथॉनवेळी महानगरपालिकेने माहिती व जनजागृतीसाठी विशेष कक्ष उभारला होता. या कक्षाद्वारे सहभागी झालेल्या महिलांना ओला व सुका कचरा वर्गीकरणाविषयी माहितीपत्रके वाटप करून जनजागृती करण्यात आली. पंचक येथील मनपा शाळा क्रमांक ४९ आणि नूतन मराठी प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी गोदावरी स्वच्छता या विषयावर पथनाट्य सादर केले. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महानगरपालिकेच्या एनएमसी.जीओव्ही.इन या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध सांकेतांक (क्यूआर कोड) स्कॅन करून स्पर्धेत सहभागी होता येईल. शहरातील काही भागात अस्वस्छतेचे प्रमाण अधिक आहे. अशा भागांमध्येही स्वच्छतेचे महत्व कळावे म्हणून यानिमित्ताने प्रयत्न करण्यात येत आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या विविध उपक्रमांत नाशिककरांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

शहर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाने कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि हरित उपक्रमांना चालना द्यावी. – मनिषा खत्री (आयुक्त, महानगरपालिका)