पारा ५.४ अंशांवर
थंडीचा मुक्काम वाढत असतानाच शुक्रवारी तापमान ५.४ अंशापर्यंत खाली घसरल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षांना तडे जाण्याची स्थिती निर्माण झाली. या पाश्र्वभूमीवर निफाड, दिंडोरी, नाशिक तालुक्यांसह द्राक्षाचे उत्पादन घेणाऱ्या पट्टय़ात रात्रभर शेकोटय़ा पेटवत उत्पादकांनी द्राक्ष बागांना थंडीपासून वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गुलाबी थंडीबरोबर धुक्याचे मळभही दाटले गेले. तापमानाने नीचांकी पातळी गाठली असताना बोचरा वारा वाहत असल्याने हुडहुडी भरविणाऱ्या थंडीची प्रचिती येत आहे.
काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणाचे मळभ दाटल्याने उंचावलेले तापमान आकाश निरभ्र झाल्यावर झपाटय़ाने खाली आले.
नववर्षांत प्रवेश करण्याची घटिका जवळ येत असताना वातावरणातील या बदलांनी सर्वसामान्य सुखावले आहेत. देशाच्या उत्तर भागातील बर्फवृष्टीचा परिणाम नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील वातावरणावर होत असतो. हिवाळ्यात जानेवारी वा फेब्रुवारी महिन्यात नाशिकचे तापमान चार ते पाच अंशापर्यंत खाली येते. यंदा महिनाभर आधीच ही पातळी गाठली गेली. आता तर थंडीच्या लाटेचा मुक्काम वाढला आहे. तीन दिवसांपूर्वी म्हणजे बुधवारी सहा अंशावर असणाऱ्या तापमानात गुरुवारी किंचितशी वाढ होऊन ते ६.४ अंशावर गेले होते. शुक्रवारी तापमानाचा पारा ५.४ अंशापर्यंत खाली आला. हंगामात सलग दुसऱ्यांदा राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली. थंडगार वारा असल्याने दिवसभर उबदार कपडे परिधान करणे क्रमप्राप्त ठरले आहे. सलग काही दिवसांपासून गुलाबी थंडीचा आस्वाद घेणाऱ्या नाशिकमध्ये नववर्षांत नेमके कसे चित्र राहणार याबद्दल सर्वाना उत्सुकता आहे.
राहिल्यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष घडात पाणी साचते. त्यामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची शक्यता असते.
थंडीपासून बचावासाठी द्राक्ष बागांवर औषधांची अतिरिक्त फवारणी करावी लागू नये म्हणून उत्पादकांनी दक्षता घेण्याची धडपड चालविली आहे. जिल्ह्य़ातील निफाड, नाशिक, दिंडोरी आदी तालुके द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहेत. या पट्टय़ात शेतकऱ्यांना रात्र अक्षरश: जागून काढावी लागते. मध्यरात्री तीन वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. बागेत काही विशिष्ट अंतरावर ठिकठिकाणी शेकोटी पेटवून द्राक्ष घडांसाठी उबदार वातावरण तयार केले जाते.
पाणी साचू नये म्हणून ही दक्षता घेणे भाग पडल्याचे उत्पादकांनी सांगितले.
मागील सहा ते सात दिवसांपासून दररोज संपूर्ण कुटुंबीय रात्री या कामात जुंपत असल्याचे दिसते. या संकटात रात्री भारनियमन केले जात असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वीजपुरवठय़ाअभावी पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याची त्यांची तक्रार आहे.
एसटी महामंडळाचा अजब कारभार?
राज्य परिवहन महामंडळाच्या अजब कारभाराने प्रवाशांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्य़ात थंडीचा तडाखा वाढत असताना एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी शहर वाहतूक करणाऱ्या विनादरवाजांच्या बसेसचा वापर सुरू केला. परिणामी, पहाटे व सायंकाळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कडाक्याच्या थंडीची झळ सोसावी लागत असल्याची तक्रार देवळ्यातील प्रवाशांनी केली. लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी बंद दरवाजाच्या बसेस देण्याची मागणी त्यांनी केली आहे.