नाशिक : दिंडोरी मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा कोणाला द्यायचा, याविषयी कोल्हापूर, सांगली, हातकणंगले येथील मतदान झाल्यानंतर ठरविले जाईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली आहे. दिंडोरी मतदारसंघात कांदा उत्पादकांची संख्या अधिक असून त्यांच्यात निर्यातबंदीमुळे केंद्राविरोधात रोष आहे. या पार्श्वभूमीवर, स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. मागील पाच वर्षांमध्ये या मतदारसंघातील कांदा, द्राक्ष ,जिल्हा बँक, अवकाळी पावसाने झालेले नुकसान, याविषयावर प्रदेशाध्यक्ष जगताप यांच्या नेतृत्वात सातत्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले आहे. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य लोकांच्या बाजूने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडेही दिंडोरी मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी काही जण इच्छुक होते. परंतु, मतांचे विभाजन होऊ नये आणि संघटनेकडे आर्थिक ताकद नसल्यामुळे दिंडोरीत उमेदवार देण्यास संघटनेने नकार दिला.
दिंडोरी मतदारसंघात स्वाभिमानी काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. सध्या हातकणंगले मतदारसंघात संघटनेचे सर्व पदाधिकारी प्रचारात गुंतले आहेत. हातकणंगले येथे सात मे रोजी मतदान संपल्यावर दिंडोरी मतदार संघात कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जगताप यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा… प्रचारात कांदाप्रश्नाविषयी भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना
हेही वाचा… नाशिक : सिडको चौपाटीतील आगीत तीन जण गंभीर
दिंडोरी मतदार संघातील उमेदवारीचे अंतिम चित्र पाच मेनंतर स्पष्ट होईल. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल. आमच्याकडे आतापर्यंत अनेकांनी संपर्क करून आम्हाला पाठिंबा द्यावा, असे म्हटले आहे. भाजपला पाठिंबा देण्याचा आमच्यासमोर प्रश्नच नाही. कारण पाच वर्ष आम्हीच त्यांच्याविरुद्ध लढलो आहोत. महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा, अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की निवडणुकीत अलिप्त राहायचे, असे तीन पर्याय आमच्यासमोर आहेत. सर्वांशी चर्चा करून सात मेनंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू,असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जगताप यांनी म्हटले आहे.