‘लोकसत्ता लोकांकिका’ची आज आणि उद्या प्राथमिक फेरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पर्धा म्हटली की रंगकर्मी अनावरऊर्मीने झपाटून जातात. लेखकासह कलावंत एखादे पात्र रसिकांच्या कायम लक्षात राहील यासाठी आटापिटा करतात. रंगमंचावरच्या या गर्दीत पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील ‘नारायण’ पात्रासारखा ‘बॅक स्टेज’ कलाकार मात्र कलावंताचा रंगमंचावरील वावर सुकर कसा होईल यासाठी प्रयत्न करीत असतो. अशा पडद्यामागील कलाकारांमुळे नाटकातील जिवंतपणा आजही टिकून असल्याची भावना युवा रंगकर्मीनी व्यक्त केली.

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पाचव्या पर्वाची नाशिक विभागीय प्राथमिक फेरी ७ आणि ८ डिसेंबर रोजी होणार आहे. एकांकिका उभी करण्यासाठी कलावंत, लेखक, दिग्दर्शक असे प्रत्येक जण कामाला लागले आहेत. गर्दीच्या कोलाहलात एक घटक मात्र काहीसा निवांत पण तितकाच तत्परतेने या कलावंतांमागे धडपड करीत फिरत आहे. ‘बॅक स्टेज’ कलावंत अशी त्यांची ओळख असली तरी नाटक उभे राहण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

लेखक म्हणून संहिता वाचन करून दाखवीत असताना दिग्दर्शकासोबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात येते. संहितेनुसार नाटकाच्या तालमीला जेव्हा सुरुवात होते, तेव्हा पडद्यामागील कलाकार खऱ्या अर्थाने नाटकात जिवंतपणा आणत असतो. आपली कलाकृती म्हणून त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा असतो, पण त्याच कलाकृतीकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन ही मंडळी देतात. हे इथे का, याची गरज खरेच आहे का, ते चालणार नाही का अशी सतत विचारणा या मंडळींकडून होत असते. या प्रश्नांवर ते पर्यायही देत असल्याने धडपडत का होईना, धमाल करीत तालमी वेग घेतात, असे नाशिक येथील बी. वाय. के. महाविद्यालयाच्या प्रिया जैन हिने सांगितले.

अभिनयात आपले नाणे चालणार नाही हे ज्यांना निश्चित माहिती असते, पण नाटकासाठी आवश्यक असलेले वेळेचे तंत्र ज्यांनी आत्मसात केले, अशी मंडळी पडद्यामागील कलाकाराची भूमिका खऱ्या अर्थाने वठवतात. रंगमंचावर नाटक सुरू असताना संगीत, प्रकाशयोजना, पाठीमागून संवादासाठी साथ, अशी कामे व्यवस्थित करतात. काहींना रंगभूषा, वेशभूषेत प्रयोग करायला आवडतात तर काही जण आपल्या सभोवताली वावरणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास करत असतात. त्यांची अशी काही निरीक्षणे नाटकाच्या वेळी उपयोगी पडत असल्याचे चोपडा येथील महात्मा गांधी कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. हरीश चौधरी म्हणाले.

नाटकासाठी संगीत, प्रकाशयोजनेची बाजू सांभाळण्यासाठी त्या त्या क्षेत्राचे ज्ञान आवश्यक आहे. महाविद्यालयीन युवकांमध्ये संगीताची आवड गाणे ऐकण्यापर्यंत मर्यादित असते. सुदैवाने प्रशांत भिसे आणि प्रसाद सौंदाणकर यांना संगीताची आवड असून प्रशांत संबळ वाजवतो. त्यामुळे एकांकिकेमध्ये कुठल्या ठिकाणी काय द्यायचे, हे त्याला वेगळे सांगावे लागत नाही. नाटकात काही ठिकाणी प्रत्यक्ष तर काही ठिकाणी ध्वनिमुद्रित संगीताचा त्याने बेमालूम वापर केला असल्याचे लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचे प्रा. प्रवीण जाधव यांनी सांगितले.

प्रायोजक

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंड पार्टनर ‘आयरिस प्रोडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेसाठी झी मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.